लोकसत्ता टीम
वाशीम: हरितक्रांतीचे प्रणेते, ११ वर्षे मुख्यमंत्री राहिलेले माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे प्राथमिक शिक्षण मानोरा तालुक्यातील विठोली येथे झाले. मात्र, सद्यस्थितीत ते ज्या शाळेत शिकले त्या शाळेची दयनीय अवस्था झाली असून हा ऐतिहासिक वारसा लुप्त होण्याच्या मार्गावर आहे.
मानोरा तालुक्यातील विठोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अत्यंत जुनी आहे. याच शाळेत हरितक्रांतीचे प्रणेते, माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी १९२० ते १९२१ दरम्यान प्राथमिक शिक्षण घेतले आहे. पुढे काही वर्षानंतर त्या शाळेला त्यांचेच नाव देण्यात आले. सध्या येथे पहिली पासून बारावी पर्यंत शिक्षणाची व्यवस्था असून कला व विज्ञान शाखेची व्यवस्था आहे. ज्या शाळेत वसंतराव नाईक शिकले, ती इमारत जीर्ण झाली आहे.
आणखी वाचा- भंडारा: विद्युत ट्रांसफार्मरमध्ये अडकला साप, दोन दिवस पाणी बंद
११ वर्षे राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले हरित क्रांतीचे प्रणेते, कृषी क्षेत्रात अतुल्य योगदान देणारे, राज्याला सुजलाम, सुफलाम करणारे, पंचायत राज, रोजगार हमी योजनेचे जनक म्हणून ज्यांची राज्यात ख्याती असलेले वसंतराव नाईक यांचा उदोउदो होतो. मात्र, ते ज्या शाळेत शिकले त्या शाळेच्या झालेल्या दुरावस्थेकडे कोणत्याही पुढाऱ्यांचे लक्ष नसल्याचा आरोप जनतेतून होत आहे.
विठोली येथे नवीन वर्ग खोल्या बांधण्यात आलेल्या आहेत. तेथे केवळ क्षिक्षकांची कमतरता आहे. तिथे लवकरात लवकर शिक्षक देण्यात येतील. -गजानन डाबेराव शिक्षण विभाग, जि.प.वाशीम.