‘सी- २०’ परिषदेदरम्यान विदेशी पाहुणे नागपुरात असताना रामदासपेठेतील एका खासगी रुग्णालयात आणखी एक ‘एच ३ एन २’ विषाणूचा रुग्ण आढळला. त्यामुळे उपराजधानीतील विविध रुग्णालयांत या आजाराच्या आढळलेल्या रुग्णांची संख्या सहावर पोहचली आहे.रामदासपेठच्या एका खासगी रुग्णालयात दाखल या रुग्णाला सर्दी, खोकला, तापासह श्वास घेण्यात त्रास होत होता. ‘इन्फ्लुएन्झा’ची लक्षणे बघत त्याचे नमुने स्वाईन फ्लू आणि ‘एच ३ एन २’ तपासणीसाठीही पाठवण्यात आले होते. अहवालात त्याला ‘एच ३ एन २’ असल्याचे पुढे आले. त्यामुळे शहरातील विविध खासगी रुग्णालयात आजपर्यंत आढळलेल्या या रुग्णांची संख्या सहावर गेली आहे.
हेही वाचा >>>भंडारा : धक्कादायक! सिरेगावटोला येथील अख्खे आदिवासी कुटुंब १६ दिवसांपासून बेपत्ता
मार्च २०२३ मध्येच आढळले सगळे रुग्ण
नागपुरात जानेवारी २०२३ मध्ये एच १ एन १ (स्वाईन फ्लू)चे ८ रुग्ण, फेब्रुवारी २०२३ मध्ये २ रुग्ण, मार्च २०२३ मध्ये २ असे एकूण १२ रुग्ण आढळले. तर ‘एच ३ एन २’चे मार्च महिन्यात सर्व ६ रुग्ण आढळले. त्यापैकी ४ नागपूर शहरातील होते, हे विशेष. तर नागपुरात जानेवारी २०२३ मध्ये ‘स्वाईन फ्लू’चा एक बळीही गेला आहे.