लोकसत्ता टीम
नागपूर : उपराजधानीत थंडीचा प्रभाव कमी झाला आहे. शहरात दिवसा ऊन तर रात्री वातावरण थंड होऊन तापमानात वारंवार बदल बघायला मिळत आहे. त्यामुळे शहरात घरोघरी सर्दी, खोकला, तापाचे (व्हायरल) रुग्ण वाढले आहे. त्यामुळे शहरातील शासकीय व खासगी रुग्णालयांत रुग्णसंख्या वाढली आहे.
राज्यासह नागपुरात एकीकडे गुइलेन बॅरे सिंड्रोमचे (जीबीएस) रुग्ण वाढत असताना दुसरीकडे नागरिकांमध्ये एचएमपीव्ही आजाराची धास्ती आहे. त्यातच हल्ली नागपुरात दिवसा तापमान दुपारी ३५ अंश सेल्सिअसपर्यंत जात असून रात्री उशिरा १७ अंशपर्यंत तापमान खाली येते. या तापमान बदलाचा मानवी शरीरावर परिणाम होऊन सध्या शहरात सर्दी, खोकला व तापाचे रुग्ण वाढले आहेत.
नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) औषधशास्त्र विभागाच्या बाह्यरुग्ण विभागात पूर्वी रोज साधारण ४०० रुग्ण उपचारासाठी येत होते. ही संख्या सध्या थेट ५०० ते ६०० रुग्णापर्यंत गेली आहे. महापालिकेच्या नागरी आरोग्य केंद्रात आठवड्याला सुमारे २० ते २२ हजार रुग्ण नोंदवले जात होते. ही संख्याही तीन ते चार हजारांनी वाढल्याचे सूत्रांनी सांगितले. खासगी रुग्णालयांमध्येही गर्दी बघायला मिळत असून सगळ्याच वयोगटातील हे रुग्ण आहे.
तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात ?
शहरात दिवसा ऊन तर रात्री थंडी आहे. नागरिक फ्रिजचे थंड पाणी व शितपेय, आईसक्रिम, कुल्फीचे सेवनही करताना दिसतात. परिणामी, ‘व्हायरल’ आजाराचे रुग्ण वाढले आहे. सकस आहार घेणेसह इतर काळजी घेतल्यास आजार टाळणे शक्य आहे, अशी माहिती नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) औषधशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. अतुल राजकोंडावार यांनी दिली.
जीबीएस रुग्णांची स्थिती काय?
शहरात गुइलेन बॅरे सिंड्रोमचे (जीबीएस) रुग्ण वाढत आहेत. शहरातील एका खासगी रुग्णालयात फेब्रुवारी महिन्यातील या आजाराचा पहिला रुग्ण आढळला. त्यामुळे नागपूर जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये आजपर्यंत आढळलेल्या या आजाराची रुग्णसंख्या थेट १५ वर पोहचली आहे. धंतोलीतील एका खासगी रुग्णालयात आढळलेला १३ वर्षीय रुग्ण हा बुटीबोरी परिसरातील आहे. येथील तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीत त्यावर उपचार सुरू आहे. आरोग्य विभागाकडून हात, पाय लुळे असलेल्यांची पोलिओ संशयित म्हणून तपासणी केली जाते. या तपासणीत मुलाला जीबीएस असल्याचे निदान झाले. हा फेब्रुवारी महिन्यात आढळलेला या आजाराचा जिल्ह्यातील पहिला रुग्ण आहे. जानेवारीतही बुटीबोरीला एका मुलाला जीबीएस असल्याचे पुढे आले होते.