नागपूर : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) रुग्णांना अद्ययावत उपचार मिळत असल्याचा दावा येथील प्रशासन करीत असते. परंतु, हा दावा किती फोल असून वरून सुसज्ज दिसणाऱ्या या इमारतीत गरीब रुग्णांची कशी फरफट होत आहे, याचे जळजळीत वास्तव ‘पेशंट्स राईट्स फोरम’च्या तक्रारीवरून समोर आले आहे.
पेशंट्स राईट्स फोरमच्या तक्रारीनुसार, येथे पेटस्कॅनसाठी रुग्णांची सात महिन्यांपासून फरफट सुरू आहे. तपासणीला आलेल्या रुग्णांना औषध नसल्याचे सांगत परत पाठवले जात आहे. लक्ष्मीबाई (बदललेले नाव) या मूळ चंद्रपूरच्या असून त्यांच्या पतीचे आधीच निधन झाले आहे. त्यांना अनेक महिन्यांपासून प्लेटलेट्स वाढीचा त्रास आहे. त्यामुळे त्यांच्या छातीत खूप दुखते. एम्सला चांगला उपचार मिळेल असे ऐकून त्या येथे उपचाराला आल्या. येथील डॉक्टरांनी त्यांना पेटस्कॅनचा सल्ला दिला. एम्सला पेटस्कॅन होत असल्याचेही सांगण्यात आले. तेव्हापासून सतत सात महिने संबंधित विभागात चकरा मारत आहेत. त्यांना प्रत्येक वेळी औषध संपल्याचे सांगत परत पाठवले जाते. ही औषध कधी येणार याची पुढची तारीखही सांगण्यात येते. त्यानुसार त्या उसनवारीवर पैशाची जुळवाजुळव करून चंद्रपूरहून एम्सला पोहोचतात. परंतु प्रत्येकवेळी त्यांना परत पाठवले जाते. त्यांनी याबाबत पेशंट्स राईट्स फोरमकडे तक्रार दिली. त्यानंतर फोरमने २२ डिसेंबरला एम्सच्या वैद्यकीय अधीक्षक कार्यालयात तक्रार दिली. परंतु, अद्याप तरी यावर काहीच मार्ग निघाला नसून रुग्णांची फरफट सुरूच आहे.
“एम्ससह इतरही शासकीय रुग्णालयात गरीब व मध्यमवर्गीयांवर उत्तम उपचाराचा दावा केला जात असला तरी वास्तव वेगळे आहे. तपासणीसाठी रुग्णांना सात महिने फिरवले जात आहे. रुग्ण दगावल्यावर एम्स प्रशासन त्यांना औषध उपलब्ध करून देणार का, हा खरा प्रश्न आहे.” – राज खंडारे, समन्वयक, पेशंट्स राईट्स फोरम.