वर्धा: लालचुटुक, अंगाने रसदार व चवीला मधुर अशी स्ट्रॉबेरीची फळे प्रथमदर्शनी मोहात पाडतात. प्रामुख्याने थंड वातावरणात पिकणारे हे फळ आहे. मात्र इकडे विदर्भाच्या उष्ण वातावरणात पण हे फळ पाहून तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उदगारले होते की अरे वाह, विदर्भात पण स्ट्रॉबेरी ? त्याच भेटीत तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या फळाची चव घेतली होती. शिंदे तर बोलून गेले की मी पण माझ्या दरे गावात स्ट्रॉबेरी पीकवितो. पण त्यापेक्षा ही फळे अधिक रसदार आहेत. प्रसिद्ध अभिनेता अमीर खान यांनाही या वैदर्भीय स्ट्रॉबेरीने मोहात पाडले आहे.
तर अशी ही फळे आता नागपूरकरांच्या पसंतीस उतरली आहे. समुद्रपूर तालुक्यातील कात्री या गावातील पाटील कुटुंब या फळाचे उत्पादन घेत आहे. त्यांचे यश इतरांनाही प्रेरक ठरत आहे. मालास चांगला भाव मिळावा म्हणून पाटील कुटुंब स्वतः विक्री करतात. दोन दिवसापासून त्यांनी नागपुरात विभागीय आयुक्त कार्यालय परिसरात विक्री सूरू केली. अधिकारी, कर्मचारी, येणारे नागरिक हे या स्ट्रॉबेरीफळास पावती देऊन गेले. ५० व १०० रुपये टोपली असा भाव आहे. अर्धा ते एक किलो दरम्यान टोपलीत फळे असतात. आज शुक्रवारी पण विक्री राहणार असल्याचे भारती पाटील यांनी सांगितले. त्या व त्यांचे पती महेश पाटील तसेच सासरे शंकरराव पाटील यांनी उष्ण वातावरणात ही फळे पिकवून चांगले उत्पादन घेण्याचा चमत्कार घडविला. ज्येष्ठ माहिती अधिकारी अनिल गडेकर म्हणाले की पाटील कुटुंबाने माफक दरात स्ट्रॉबेरी आम्हास उपलब्ध करून दिली. मुंबईत एवढी फळे पाचशे रुपयात पडली असती.
सध्या या परिसरात ११ एकरमध्ये स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेतल्या जात आहे. वर्षभरपूर्वी येथे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत राहूल कर्डीले यांनी या शेतास भेट देऊन पाहणी केली. तसेच इतर शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरी पिकवावी, म्हणून प्रोत्साहन दिले. जिल्हा नियोजन समितीच्या नावीन्यपूर्ण योजनेतून काही शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून निधी पण देण्यात आला आहे. एका एकरात ६० ते ७० लाख रुपयांचे उत्पादन होत असल्याचे सांगण्यात येते. अधिक उत्पादन शेतकऱ्यांनी घ्यावे म्हणून सेलसुरा येथील कृषी विज्ञान केंद्रात पथदर्शी स्ट्रॉबेरी प्रकल्प सूरू करण्यात आला आहे. थंड हवामानातील हे पिक नं घेण्याचा सल्ला पाटील कुटुंबास अनेकांनी दिला होता. पण तो मनावर नं घेता या कुटुंबाने स्ट्रॉबेरी फुलविली. आणि आता वेगवेगळ्या जिल्ह्यात विक्री करीत ते आर्थिक लाभ पण मिळवीत आहे.