लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यवतमाळ : येथील वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालयात रुग्ण घेऊन येणाऱ्या नातेवाईकांना सध्या वाहन चोरीच्या भीतीने ग्रासले आहे.

रुग्णालयाच्या पार्किंगमधून दुचाकी चोरीच्या घटना सातत्याने घडत आहे. त्यामुळे रुग्णाकडे लक्ष द्यावे, की वाहन सांभाळावे, अशी स्थिती आहे. पोलीस पथकाने एका संशयित चोरट्यावर महिनाभर पाळत ठेवून त्याला बेड्या ठोकल्या. मात्र, तरीही चोरीच्या घटनांना आळा बसला नाही. मेडिकल परिसरात चोरटे सक्रीय राहतात आणि रुग्णांना घेऊन येणार्‍या दुचाकीवर त्यांचा डोळा राहतो. पार्किंग परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले, मात्र तेही कुचकामी ठरत आहे.

आणखी वाचा-वर्धा : रोटरीला खासदारांचे आदरातिथ्य हवे, मात्र सन्मान देणार नाही; समर्थक संतप्त…

वैद्यकीय महाविद्यालयात दिवसभर शेकडो वाहनांची ये-जा असते. दुपारपर्यंत बाह्यरुग्ण विभाग सुरू राहत असल्याने उपचारासाठी जिल्हाभरातून नातेवाईक रुग्णांना दुचाकीने घेवून येतात. पार्किंगमध्ये वाहन उभे करून नातेवाईक आतमध्ये जातात. बहुतांश वेळा नातेवाईक भरती असलेल्या रुग्णांना भेटण्यासाठी जातात. अशा वेळी चोरटे सक्रिय होतात. आपल्याकडे कुणाचेही लक्ष नाही, असे दिसताच मोठ्या शिताफीने दुचाकी हातोहात लंपास करतात. दोन दिवसाआड दुचाकी चोरी जाण्याच्या घटना घडत आहेत. त्याचा फटका रुग्णांच्या नातेवाईकांना सहन करावा लागत आहे. सुरक्षारक्षकांची संख्या कमी असल्याने पार्किंग परिसरावर ‘वॉच’ ठेवण्यासाठी एक पीटीझेड व दोन सामान्य सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. मात्र, बहुतांश वेळ कॅमेरे बंदच असतात. त्यामुळे त्याचा फायदा होत नाही. वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पूर्णवेळ सुरक्षारक्षक तैनात करण्याची मागणी आहे.

मेडिकलमधील पार्किंग परिसरात नियोजनासह शिस्तीचा अभाव आहे. पूर्वी पार्किंगच्या आतच वाहने उभी करण्यात येत होती. बाहेर कुणाचेही वाहन दिसल्यास दंडात्मक कारवाई होत होती. मात्र, अलिकडे जागा मिळेल तिथे वाहन उभे केले जाते. त्याचाही फायदा चोरटे घेत आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pay attention to patients or take care of the vehicle patients relatives are in trouble nrp 78 mrj
Show comments