नागपूर : सदर पोलीस ठाण्यातील एका लाचखोर पोलीस हवालदारासह वेतन व भविष्य निर्वाह निधी (माध्यमिक) कार्यालयाच्या अधीक्षकाला लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पहिली कारवाई आज दुपारी पोलीस ठाण्यातच करण्यात आली. शेख जमील शेख महबूब (५५, रा. प्लॉट न.७०, नेहरू कॉलनी, पेन्शन नगर) असे लाचखोर हवालदाराचे नाव आहे, तर प्रमोद झांगोजी सोनटक्के (५३, रा. फ्लॅट क्र.५०७, पाचवा माळा, लाईफ स्टाईल सोसायटी) असे लाच घेणाऱ्या अधीक्षकाचे नाव आहे.

हेही वाचा – भाजपच्या बालेकिल्ल्यात आज अंधारेंची तोफ धडधडणार

गेल्या काही दिवसांपासून सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हुक्का पार्लर, सेक्स रॅकेट, वरली-मटका, जुगार अड्डे, गोतस्करी, मांस विक्री आणि मध्यरात्रीनंतरही बार-रेस्ट्रॉरेंट सुरू राहत असल्यामुळे ठाणे चर्चेत होते. आता लाचखोर कर्मचाऱ्यामुळे पुन्हा एकदा सदर पोलीस ठाणे चर्चेत आले आहे. पोलीस हवालदार शेख जमील याने ५६ वर्षे वयाच्या तक्रारदाराविरुद्ध पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल केला होता. त्या गुन्ह्यातून निर्दोष सुटका होईल अशी व्यवस्था करण्यासाठी शेख जमील याने ५ हजार रुपये लाचेची मागणी केली. मात्र, तक्रारदाराने एसीबी कार्यालयात तक्रार केली. एसीबीने बुधवारी दुपारी सदर पोलीस ठाण्यात सापळा रचला. सापळ्यात हवालदार शेख जमील हा ३ हजार रुपयांची लाच स्वीकारताना अलगद अडकला. त्याच्या साथीला ‘कलेक्टर’ वादग्रस्त कर्मचारीही होता. त्याचीही एसीबीने तासभर चौकशी केली. शेख जमील यांनी घेतलेल्या लाचेच्या रकमेतून कुण्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना काही रक्कम देणार होता का? याचा एसीबी तपास करीत आहेत. लाचेच्या रकमेसह एसीबीने शेख जमील याला अटक केली.

हेही वाचा – ‘‘ड्रग्ज प्रकरणावरून प्रश्न विचारल्याने ‘ते’ मला धमकावत आहेत!”, सुषमा अंधारेंचा रोख नेमका कुणाकडे?

एका शाळेतील सेवानिवृत मुख्याध्यापकाची अर्जित रजेचे रोखिकरणाची एकूण १३ लाख ३० हजार रुपयांची रक्कम शासनाकडे बाकी होती. ती रक्कम काढण्यासाठी मुख्याध्यापकांनी सर्व कागदपत्रे तयार केली. ती कागदपत्रे वेतन व भविष्य निर्वाह निधी (माध्यमिक) कार्यालय, प्रशासकीय इमारत क्र.२, सातवा माळा येथे जमा केली. त्यांची रक्कम काढून देण्यासाठी कार्यालयाचे अधीक्षक प्रमोद झांगोजी सोनटक्के यांनी ५० हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीअंती ४० हजारांची लाच स्वीकारण्याची तयारी दर्शविली. बुधवारी दुपारी सोनटक्के यांनी लाच घेताच त्यांना एसीबीने अटक केली. त्यांच्या घराची झडती घेण्यात आली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pay superintendent arrested along with police constable for taking bribe adk 83 ssb