यवतमाळ : शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राज्यात  शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही याची कायमच काळजी घेतली. छत्रपती शिवाजी महाराजांना शेती आणि शेतकऱ्यांविषयक कायम आस्था होती. हाच धागा पकडत उद्या साजऱ्या होत असलेल्या शिवजयंतीच्या अनुषंगाने यवतमाळ येथील प्रा. सोनल देशमुख यांनी आपल्या कृतीतून छत्रपती शिवाजी महाराजांना अनोखे अभिवादन केले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जंयतीच्या मुहूर्तावर यवतमाळ जिल्ह्यात ‘घराघरात एक जिजाऊ, एक शिवबाराजे’ हा उपक्रम आयोजित केला आहे. या  उपक्रमाच्या माध्यमातून स्वराज्यात शेतीचे महत्व अधोरेखित करणारी  वेशभूषा करून प्रा. सोनल प्रफुल देशमुख आणि त्यांचा मुलगा श्रेयान यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शेती विषयक धोरणांना उजाळा दिला आहे.

शिवरायांचा इतिहास हा केवळ युद्धापुरता मर्यादित नाही, तर त्यांनी आपल्या राज्यात सुशासन आणले. लोककल्याणकारी राज्य हे शिवरायांचे धोरण होते. शेतकर्‍यांचे हित हेच राज्याचे हित, असे छत्रपती शिवाजी महाराज मानायचे. त्यांचे कृषी धोरण आजही दिशादर्शक आहे. शिवाजी महाराजांच्या काळात शेतीची अधिकृत मोजणी करण्याची पद्धत अंमलात आली. याशिवाय शेतकऱ्याला मिळणाऱ्या उत्पन्नाचे पाच भाग करुन त्याच्याकडे तीन तर स्वराज्य कार्यासाठी दोन वाटे देण्याचा निर्णय त्यावेळी घेण्यात आला होता. मात्र दुष्काळासारखी आपत्ती आल्यास शेतकऱ्यांना ‘तगाई’ म्हणजेच आगाऊ रक्कम देण्याची सुविधा स्वराज्यात निर्माण झाली होती. तिची परतफेड करण्यास शेतकऱ्यांना चार ते पाच वर्षांचा कालावधी दिला जात असे.

आपल्या राज्यातील शेतकर्‍यांना कोणत्याही स्वरुपाची इजा पोहोचणार नाही, याची खबरदारी छत्रपती शिवाजी महाराजांनी कायमच घेतली. त्याची अनेक उदाहरणे आजही दिली जातात. शाहिस्तेखान पुण्याकडे चालून येत असल्याची गुप्त माहिती छत्रपती शिवरायांना मिळाली, तेव्हा त्यांनी सर्जेराव जेधे यांना तत्काळ निरोप पाठवून शेतकर्‍यांना सुरक्षितस्थळी हलवण्याच्या सूचना केल्या. या कामात हयगय केली तर पातक लागेल, असेही आवर्जून सांगितले. चिपळूण येथील आपल्या हवालदाराला पाठवलेल्या पत्रात छत्रपती शिवराय म्हणतात, ‘संध्याकाळी झोपताना तेलवातीचे दिवे विझवून झोपत जावा. रंधनाळे, आगट्या विझविल्यात का ते स्वत: खात्री करा, अन्यथा आग लागेल. त्यात जनावरांचा चारा, धान्य जळून खाक होईल. मग तुम्ही शेतकर्‍यांचे धान्य, लाकूड, पाला, भाजी, पीक आणाल. मग रयत म्हणेल की, हे तर मोगलच आले. शेतकर्‍यांना त्रास होईल असे वागू नका, विना मोबदला कोणाचे काही घेऊ नका. शेतकर्‍यांच्या गवताच्या काडीला आणि भाजीच्या देठालाही हात लावू नका,’ अशा प्रकारच्या सूचना छत्रपती शिवाजी महाराज आपल्या अधिकाऱ्यांना देत असत. तसेच एखादे वर्षी अतिरिक्त उत्पन्न झाल्यास अतिरिक्त उत्पादित झालेला माल शेतकर्‍यांना योग्य मोबदला देऊन खरेदी करा. त्याची साठवणूक करून हा माल परमुलूखात नेऊन विका. योग्य भाव मिळत नाही, तोपर्यंत चार-पाच बाजार करून विका,’ अशा सूचना ते अधिकाऱ्यांना द्यायचे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यात राबविलेले धोरण वर्तमान राज्यकर्त्यांनी राबविले तर शेतकऱ्यांच्या अनेक समस्या सुटू शकतात. शिवाय शेतकरीही शिवबांच्या धोरणाप्रमाणे शेती कसू लागले तर शेती आणि शेतकरी समृद्ध होईल, हा संदेश देण्यासाठी प्रा. सोनल देशमुख आणि त्यांचा मुलगा श्रेयान यांनी जिजाऊ माँ साहेब आणि लहानगा शिवबा यांची शिवकालीन वेशभूषा साकारून छत्रपती शिवाजी महाराज यांना अनोखे अभिवादन केले. यवतमाळ येथे सुरू असलेल्या छत्रपती महोत्सवात या मायलेकाचे विशेष कौतुक होत आहे. या वेशभूषेतील लहानगा शिवबा बघून आज मोबाईलमध्ये रमणाऱ्या मुलांना शेतीची ओढ लागेल. त्यांनाही आपल्या आई, वडिलांसोबत शेतात जाण्याची इच्छा निर्माण होईल, असा विश्वास प्रा. सोनल देशमुख यांनी व्यक्त केला.

Story img Loader