नागपूर : “नाच रे मोरा.. आंब्याच्या बनात.. नाच रे मोरा नाच…” हे गाणं ऐकलं नाही, आवडलं नाही आणि गायलं नाही असं क्वचितच कुणी असेल. पण हा मोर खरंच आंब्याच्या बनातच नाचतो का, हे क्वचितच कुणाला ठाऊक असेल. जंगलात मात्र कित्येकदा मोराला नाचताना पाहिलंय आणि ते सुद्धा पाऊस पडायची वेळ असेल किंवा पाऊस पडत असेल अथवा पडून गेला असेल. बोर व्याघ्रप्रकल्पात मात्र काही दिवसांपूर्वी विपरीतच घडले. येथे चक्क माकडांची मैफल भरली होती आणि त्या मैफलीत मोराने त्याचे नृत्य सादर केले. वन्यजीव छायाचित्रकार अमित खापरे यांनी ते कॅमेऱ्यात कैद केले.
सर्वात कमी क्षेत्रफळ असलेला महाराष्ट्रातील एकमेव व्याघ्रप्रकल्प म्हणजे बोर व्याघ्रप्रकल्प. सुरुवातीला या व्याघ्रप्रकल्पात पर्यटकांची फारशी रीघ नव्हती. मात्र, हळूहळू या व्याघ्रप्रकल्पातील वाघांनी पर्यटकांना आपल्याकडे खेचले आणि आता तर पर्यटकांच्या पसंतीच्या व्याघ्रप्रकल्पाच्या बोर व्याघ्रप्रकल्प समाविष्ट झाला. सहज होणारे व्याघ्रदर्शन ही व्याघ्रप्रकल्पाची खासियत. फारशी गर्दी नाही, गोंधळ नाही. त्यामुळे अगदी आरामात या व्याघ्रप्रकल्पात व्याघ्रदर्शनचा सोहळा अनुभवता येतो.
“कतरिना” नावाची वाघीण गेल्या कित्येक वर्षांपासून पर्यटकांना दर्शन देत आहे. गेल्या चार वर्षांपासून वाघांसोबतच अस्वलामुळे देखील हा व्याघ्रप्रकल्प चर्चेत आला आहे. अस्वलाच्या दुर्मीळ असे ल्युसिस्टिक पिल्लं तल्या बोर व्याघ्रप्रकल्पात आढळत आहेत. २०२० मध्ये पहिल्यांदा एक मादी अस्वल एका पांढऱ्या व तपकिरी रंगाचे पिल्लांना पाठीवरून भटकंती करताना दिसली होती. २०२२ मध्ये एक वनरक्षकाला तपकिरी रंगाची दोन पिल्लं दिसून आली. तर आता अलीकडे पुन्हा तपकिरी रंगांची अस्वलाची पिल्लं दिसून आली. बोर व्याघ्र प्रकल्प हे महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातील हिंगणीजवळ असलेले एक वन्यजीव अभयारण्य आहे. हे एक महत्त्वाचे वन्यजीव अभयारण्य आहे, जे वाघ, कोल्हा, हायना, स्लॉथ बेअर यांसारख्या वन्य प्राण्यांसाठी ओळखले जाते. २०१४ मध्ये याला व्याघ्र अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले.
बोर व्याघ्रप्रकल्पात काही दिवसांपूर्वी एक वेगळेच दृश्य दिसून आले. माकडांची मस्त मैफिल याठिकाणी जमलेली होती. म्हणजे कळपाने माकडे एखाद्या मैफलीत बसावीत तशी बसलेली होती. तेवढ्यात मोर त्याठिकाणी आला आणि त्याने पिसारा फुलवला. (Video Credit – वन्यजीव छायाचित्रकार अमित खापरे) pic.twitter.com/3VfURXSKvC
— LoksattaLive (@LoksattaLive) April 26, 2025
दरम्यान याच व्याघ्रप्रकल्पात काही दिवसांपूर्वी एक वेगळेच दृश्य दिसून आले. माकडांची मस्त मैफिल याठिकाणी जमलेली होती. म्हणजे कळपाने माकडे एखाद्या मैफलीत बसावीत तशी बसलेली होती. तेवढ्यात मोर त्याठिकाणी आला आणि त्याने पिसारा फुलवला. माकडांची लक्ष त्या मोराकडे गेले. हे पाहून मोरालाही जोर चढला आणि पाऊस पडण्याआधी किंवा पाऊस पडल्यानंतर मोर जसा आनंदाने बेभान होऊन नाचतो, तसेचनृत्य या माकडांच्या मैफलीत मोराने सादर केले.