नागपूर : “तो” जखमेने विव्हळत होता.. “त्या” ला प्रचंड वेदना होत होत्या. एकीकडे राजभवनात शपथविधी सोहळा तर दुसरीकडे त्याच शपथविधी सोहळ्यामुळे त्याच्यावर जीवघेणे संकट उद्भवले होते. मात्र, शपथविधी सोहळ्यात सहभागी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आमदार, अधिकारी नागरिक यांना त्याच्याशी काहीही देणेघेणे नव्हते. या राजकीय मांदियाळीत कुणी त्याच्याकडे ढुंकूनही पाहिले नाही, जेव्हा की त्यांच्यामुळे त्याची ही अवस्था झाली होती. आता तो रुग्णालयात जीवन-मरणाची लढाई लढत आहे.
अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राजभवनात मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. (आणि तोही खातेवाटपाविना). शपथविधी सोहळ्याला मोठी धामधूम होती. “तो” त्यांच्यासाठी महत्वाचा नव्हता (जेव्हा की राष्ट्रीय पातळीवर त्याला सन्मानित करण्यात आले आहे) त्याला कुणी आमंत्रित देखील केले नव्हते. तरीही तो त्याठिकाणी आला. कारण हा सर्व सोहोळा त्याच्याच घरात सुरू होता.
हे ही वाचा… संघाविषयीच्या भूमिकेवरून अजित पवारांच्या राष्ट्रवादीत फूट, दोन आमदार संघस्थळी
शपथविधी सोहोळा पार पडला आणि सर्व आपापल्या वाहनाने निघून गेले. शेकडो वाहने होती आणि बरीचशी लाल दिव्यांची, पोलिसांची आणि एवढेच काय तर रुग्णवाहिका सुद्धा होती. त्यातल्याच काही वाहनांनी त्याला धडक दिली. तो जखमेने विव्हळत राहिला, पण एकानेही त्याच्याकडे ढुंकूनही पाहिले नाही. तो रात्रभर वेदनेने विव्हळत होता. मात्र, दुसऱ्या दिवशी त्याच राजभवनातून एक दूरध्वनी खणखणला आणि तातडीने डॉक्टर, कर्मचारी यांच्यासह एक रुग्णवाहिका राजभवनाकडे सुसाट वेगाने सुटली. या चमुला कुणीही पास विचारली नाही. “राष्ट्रीय पक्षी” (पक्ष नव्हे) मोर याचे नाव सांगताच पोलिसांसह सर्वांनी आत जाऊ दिले. आत गेल्या गेल्या पोलीस निरीक्षक दर्जाचे अधिकारी आमची वाट बघतच होते. लगेच ते सेमीनरी हिल्सवरील “ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर” च्या चमूला आत घेऊन गेले. राज्यपालांची भेट नाही झाली पण संकटात सापडलेल्या राष्ट्रीय पक्ष्याला संकटातून सोडवण्यास सुरुवात केली. राष्ट्रीय पक्षी दुसरा कुणी नसून मोर होता.
हे ही वाचा… भाजप आमदार स्पष्टच बोलले, म्हणाले पंकजा मुंडेंनी भाजपचे काम केले नाही
आदल्या दिवशी शपथ विधीच्या धामधुमीत कुणाला तो दिसला नाही, पण एवढ्या साऱ्या मान्यवरांच्या गाडीला तो धडकला. त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. भारतातील पहिल्या “ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर” मध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत. तो पूर्णपणे बरा झाल्यानंतर त्याच्या मूळ निवासस्थानी म्हणजेच राजभवनात त्याला सोडण्यात येईल. राजभवनात असंख्य मोर आहेत.