नागपूरमधील मनीषनगर भुयारी रेल्वेमार्ग बांधताना पादचाऱ्यांचा विचारच करण्यात आला नाही. त्यामुळे त्यांनी चालायचे कुठून, मनीषनगर येथून उज्ज्वलनगर मेट्रो स्टेशनवर यायचे कसे, असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. मनीषनगरला वर्धा मार्गाकडे जाण्यासाठी उज्ज्वलनगरमध्ये भुयारी मार्ग व उड्डाण पूल बांधण्यात आला आहे. यामुळे मनीषनगर तसेच बेसा, बेलतरोडी या भागातील नारिकांना वर्धा मार्गावर पोहचणे सोयीचे होते असल्याने या भागातील नारिकांसाठी हा मार्ग महत्त्वाचा आहे. भुयारी रेल्वेमार्गाचे डिझाईन मात्र चुकल्याचे दिसून येत आहे. या मार्गावर पदपथ (फुटपाथ) बांधण्यात आलेले नाहीत. त्यामुळे पायी चालणाऱ्यांनी येथून ये-जा करायची कशी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
हेही वाचा- VIDEO : ‘छोटी मधु’चे मन जिंकण्यासाठी ‘पारस’ व ‘तारू’ एकमेकांशी भिडले; पहा दोन वाघांमधील तुंबळ झटापट
मनीषनगरच्या नागरिकांना उज्ज्वलनगर मेट्रो स्टेशन अगदी जवळ आहे. त्यामुळे पायी सहज स्टेशनपर्यंत येऊन पुढचा प्रवास मेट्रोने करता येणे शक्य होते. तसेच परत मेट्रो स्टेशनवरून पायी घरी जाणे सोईचे आहे. मात्र, पदपथ नसल्याने या अरुंद रेल्वे भुयारी मार्गावरून चालणे जीव धोक्यात घालण्यासारखे आहे. भुयारी रेल्वेमार्ग वाहतुकीसाठी खुले केले तेव्हा दोन्ही बाजूने वाहतूक करण्यास मुभा होती. परंतु अरुंद भुयारी रेल्वेमार्ग आणि मनीषनगरच्या दिशेने रेल्वे उड्डाण पुलाचा स्तंभ यामुळे वाहतूक कोंडी होऊ लागली. त्यानंतर मनीषनगरकडून वर्धा मार्गावर येण्यासाठी उड्डाण पुलाचा वापर करण्याची सक्ती करण्यात आली. आणि भुयारी रेल्वेमार्ग केवळ वर्धा मार्गाकडून मनीषनगरकडे जाण्यासाठी उपलब्ध करण्यात आला. तरी देखील दोन्ही बाजूने वाहतूक सुरू आहे. आता मनीषनगर रेल्वे क्रॉसिंग बंद करून त्याऐवजी रेल्वे भुयारी मार्ग उभारण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे रेल्वे क्रॉसिंगवरून होणारी वाहतूक बंद झाली आहे. ही सर्व वाहतूक मनीषनगर भुयारी रेल्वेमार्ग आणि रेल्वे उड्डाण पुलाकडे वळवण्यात आली आहे. रेल्वे क्रॉसिंग बंद झाल्यानंतर मनीषनगर ते वर्धा मार्ग असा पायी चालणाऱ्यांसमोर समस्या निर्माण झाली. त्यांनी भुयारी रेल्वेमार्गाचा वापर सुरू केला, पण येथून दोन्ही बाजूने भरधाव वाहने जातात. त्यामुळे पादचाऱ्यांसाठी जागाच उरत नाही. एकतर अरुंद असलेला भुयारी मार्ग आणि फूटपाथ नसणे या गोष्टीमुळे पायी चालणाऱ्यांसाठी हा भुयारी मार्ग कूचकामी ठरला आहे.
भुयारी मार्गावर फुटपाथ अनिवार्य करा
कोणालाही रेल्वे क्रॉसिंग ओलांडून जावे लागू नये म्हणून भुयारी रेल्वेमार्ग उभारण्यात येत आहेत. परंतु येथे पादचाऱ्यांचा विचार होणे आवश्यक आहे. दोन्ही बाजूने फुटपाथ बांधून त्याला लोखंडी कठडे लावल्यास पायी चालणाऱ्यांना अंतर सुरक्षित कापता येणे शक्य आहे. मनीषनगर रेल्वे क्रॉसिंगवर बांधण्यात येत असेलल्या रेल्वे भुयारी मार्गावर अशी फूटपाथची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी मंजूषा राखडे यांनी केली.
हेही वाचा- ‘समृद्धी’ महामार्ग उठला नागपूरकरांच्या जीवावर! अठरा दिवसांत आणखी दोघांचा मृत्यू
छत्रपती चौक ते साईमंदिर कसे जाणार?
मेट्रो धावू लागल्याने शहराअंतर्गत प्रवास सुखकर झाला आहे. परंतु मेट्रो स्टेशन ते गंतव्य ठिकाण गाठताना नागरिकांची दमछाक होत आहे. वर्धा मार्गावरील साईबाबा मंदिरात दर्शन घेण्यासाठी मेट्रोने आलेले भाविक छत्रपती चौक स्थानकावर उतरतात. येथून ते मंदिरात पायी चालत येतात. परंतु मेट्रो स्टेशन ते साईबाबा मंदिर हे अवघे १०० मीटर अंतर पार करणे सोपे नाही. कारण, पदपथ नाहीत, योग्य प्रकारे चौक ओलांडण्यासाठी झेब्रा क्रॉसिंग नाहीत. त्यामुळे महिला, मुलाबाळांना बऱ्याचवेळा मेट्रो स्टेशन ते साई मंदिर हे अंतर कापणे जिकरीचे होते.