लोकसत्ता टीम
अकोला: जुन्या पेन्शनसाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत संपाला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पाठिंबा दिला. आमची सत्ता आली तर जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करू, असे आश्वासन ॲड. आंबेडकर यांनी आंदोलकांना दिले.
सरकारी कर्मचारी मंगळवारपासून बेमुदत संपावर गेले आहेत. सरकारी-निमसरकारी कर्मचारी, जिल्हा परिषदा, शासनाचे अनुदान घेणारी महानगरपालिका, नगरपालिका, प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर असे जिल्ह्यातील सहा हजार कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. राज्य शासकीय सेवेत १ नोव्हेंबर २००५ नंतर दाखल अधिकारी, कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्तिवेतन योजना लागू न करता नवीन अंशदायी योजना लागू करण्यात आली आहे. ही नवी योजना रद्द करून सरसकट सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना जुनीच निवृत्तिवेतन योजना लागू करावी, या मागणीसाठी बेमुदत संप सुरू आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी अकोल्यात आंदोलनस्थळाला भेट देऊन संपकरी कर्मचाऱ्यांशी चर्चा केली.
आणखी वाचा- नोटीसमुळे कर्मचाऱ्यांमध्ये संताप, शनिवारी काढणार रॅली
ॲड. प्रकाश आंबेडकरांनी सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागण्या समजून घेतल्या. आंदोलक कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करतांना ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पाठिंबा जाहीर केला. सरकारी कर्मचाऱ्यांची मागणी योग्य असून वंचित बहुजन आघाडी आंदोलक कर्मचाऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभी आहे, असे ॲड. आंबेडकर म्हणाले.