नागपूर : माकडाच्या पिलाला एका चारचाकी वाहनाने उडवले आणि ते वाहन सुसाट वेगाने पळाले. माकडीणीने टाहो फोडला, पण पिलाला वाचवायला कुणीही आले नाही. तिने त्या मृत पिलाला जवळच्या झुडपात नेले. पालपाचोळ्याने त्याला झाकून ठेवले आणि आता ते माकड येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक चारचाकी वाहनांवर हल्ला करते. त्या वाहनांवर बसून राहते आणि वाहन थांबले की त्या वाहनातील माणसांच्या चेहऱ्यावर मारते. गेल्या आठ दिवसांपासून सोनेगाव तलावाजवळ हा प्रकार सुरू आहे.
हेही वाचा – नागपूर : कोराडी वीज प्रकल्प सुनावणीपूर्वीच आदित्य ठाकरेंचे ट्वीट, काय म्हणाले?
सोनेगाव परिसरातील नागरिक गेल्या आठ दिवसांपासून या माकडामुळे त्रस्त आहेत. हे माकड कुठून येते हे कुणालाच कळत नाही, पण चारचाकी वाहन दिसले की लगेच त्या वाहनावर उडी मारते. वाहन कितीही वेगात असले तरी माकड त्या वाहनावरून उतरत नाही. वाहनाचे दरवाजे उघडताच आत शिरण्याचा प्रयत्न करते आणि वाहनातील माणसांच्या चेहऱ्यावर मारते. परिसरातील नागरिकांनी महानगरपालिकेकडे तक्रार केली आहे. मात्र, लावलेल्या पिंजऱ्यात ते माकड यायलाच तयार नाही. त्याला बेशुद्धीकरण करणारी बंदूक पालिकेकडे नसल्याने शेवटी वनखात्याच्या अखत्यारीतील सेमीनरी हिल्सवरील ट्रान्झिट ट्रीटमेंट केंद्राला कळवण्यात आले. मात्र, माकड मानवी वस्तीत असल्याने बेशुद्धीकरणात अडथळे येऊ शकतात. बेशुद्धीकरणाच्या बंदुकीतला डॉट माणसाला लागल्यास माणसाचा मृत्यू होण्याची शक्यता असते. त्यामुळे ट्रान्झिट केंद्र व महापालिका मिळून आज ही मोहीम राबवणार आहेत.