दिवाळी सण आनंदाचा, उत्साहाचा, आप्त स्वकीयांच्या भेटीचा. निराशेवर मात करून आनंद साजरा करण्याचा. यानिमित्ताने शहरातील विविध वस्त्यांमधील इमारती दीपमाळांनी उजळल्या आहेत. आकर्षक आणि विविधारंगी रांगोळ्यांनी आंगणे सजली असून लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वच या दीपोत्सवात उत्साहाने सहभागी झाले आहेत. ग्राहकांच्या गदीने बाजारपेठा ओसंडून वाहत आहेत. लक्ष्मीपूजनासाठी विविध मूर्ती बाजारात आल्या आहेत. झेंडूसह विविध फुलांची सजावटीसाठी मागणी वाढली आहे. वीकएण्डला सुटय़ा आल्याने चाकरमान्यांना गावाला दिवाळी साजरी करण्याची संधी मिळाली आहे. एकूणच दिवाळीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे.
‘लक्ष्मी’च्या उलाढालीतील लखलख!
घरी, दुकानात आणि व्यवसायातही लक्ष्मीचा वास कायम असावा म्हणून पारंपरिक पद्धतीने साजरे होणारे लक्ष्मीपूजन व त्यासाठी लागणाऱ्या मातीच्या मूर्ती यांची पाच दिवसांतील विक्रीची उलाढाल ही लाखोंच्या घरात असल्याची माहिती या क्षेत्रातील विक्रेत्यांनी दिली. विशेष म्हणजे पारंपरिक पद्धतीने तयार केलेल्या मूर्तीपेक्षा साच्याव्दारे तयार करणाऱ्या मूर्तीची विक्री अधिक होत असल्याने ‘लक्ष्मी’ घडविणारे हात आजही खऱ्या लक्ष्मीच्या (संपत्ती) वासापासून दूरच आहे.
कुंभारपुऱ्यातील नागोराव दोन दशकांपासून लक्ष्मीच्या मूर्ती तयार करतात. दिवाळीचा हंगाम हा त्यांच्यासाठी महत्त्वाचा असतो व त्यासाठी चार महिन्यांआधीपासून ते तयारीला लागतात. पूर्वीसारखी माती आता सहज उपलब्ध होत नाही. पणत्या, विविध प्रकारच्या मूर्ती तयार करून दिवाळीत त्या विक्रीला आणल्या जातात.
पाच दिवसांत विशेष म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच जी विक्री होईल ती महत्त्वाची असते. १०० रुपयांपासून तर एक हजार रुपयांपर्यंतचे या मूर्तीचे दर आहेत. काही ठराविक ग्राहकही त्यांचे आहेत. मात्र, त्यावरचा खर्च लक्षात घेतला तर मोजकीच शिल्लक उरते, असे त्यांचे म्हणणे आहे.
दुसरीकडे तयार मूर्ती अमरावती येथून बोलवून चार दिवसात लाखो रुपये कमाविणारे व्यापारीही शहरात मोठय़ा प्रमाणात आहेत.
साच्याव्दारे तयार केलेल्या या मूर्ती ट्रकव्दारे नागपूरमध्ये येतात आणि किरकोळ बाजारात मूर्ती १०० ते ५०० रुपये या दराने विकल्या जातात.
यातून होणारा नफा हा तिप्पटीपेक्षा जास्त असतो, असे विक्रते अनंत कोपरगावकर म्हणाले. हा व्यापार आता फक्त काही हंगामापुरता मर्यादित राहिला नाही. कारण दिवाळीला मूर्तीची वाढती मागणीचा पुरवठा करण्यासाठी वर्षभर कारखाने काम करीत असतात.
दिवळीत घरोघरी लक्ष्मीपूजन साजरे केले जाते, दुकानातही पूजा केली जाते आणि प्रत्येक ठिकाणी मूर्ती असतेच. त्यामुळे काही वर्षांपासून मूर्तीची मागणी मोठय़ा प्रमाणात वाढली असल्याचे कोपरगावकर म्हणाले. पारंपरिक पद्धतीने मूर्ती तयार करून त्या विकण्याचे दिवस संपत आले आहे, असे त्यांनी सांगितले.
लक्ष्मी पूजनाचा मुहूर्त
बुधवारी घरोघरी व प्रतिष्ठांनामध्ये लक्ष्मीची पूजा करण्यात येणार आहे. प्रदोषकाळी म्हणजेच सायंकाळी ५.४० ते ८.१० वाजतादरम्यान लक्ष्मीची पूजा करावी. ज्यांना शिवलिखीत मुहुर्तावर लाभसमयी लक्ष्मीपूजन करावयाचे असेल त्यांनी रात्री ८ ते ९.३० वाजतादरम्यान पूजन करावे. ज्यांना स्थिर लग्नावर लक्ष्मीची पूजा करावयाची असेल त्यांनी सायंकाळी ५.४४ ते ८.४८ वाजतादरम्यान, शुभ मुहूर्तावर पूजा करायची असेल तर रात्री ११.३० ते १२.३० वाजतादरम्यान पूजा करावी. रात्री १२.३० ते पहाटे २ वाजेपर्यंत ही अमृतवेळ असल्याने पूजा करता येईल. साधारणत: व्यापारी शुभ मुहूर्तावर लक्ष्मीपूजन करीत असतात.
लक्ष्मीपूजनानंतर परिसरात राहणाऱ्यांना घरी बोलावून प्रसाद द्यावा, लक्ष्मीपूजनाच्यावेळी घराला आंब्याचे तोरण बांधावे, व्यापाऱ्यांनी वही खात्याची पूजा करावी, अशी माहिती पंचांगकर्त्यां विद्या राजंदेकर यांनी दिली.