प्रशांत देशमुख, लोकसत्ता

एकीकडे अपशकुनी म्हणून तिरस्कार केल्या जाणाऱ्या घुबडाला लक्ष्मीचे वाहन म्हणून पूजल्याही जाते. मात्र, पशुप्रेमींना अशा गोष्टींचे सोयरसुतक नसतेच. निसर्गाची संपदा म्हणून ते या मुक्या प्राण्यांचा सांभाळ करतात. घुबडाच्या तीन पिल्लांना अशीच मायेची सावली येथील करुणाश्रम या अनाथ पशूंचे संगोपन करणाऱ्या संस्थेने दिली आहे.

हिंगणघाट येथील घराचे बांधकाम सुरू असताना झाडावरून घुबडाची तीन पिल्लं खाली पडली. त्याचे हाल पाहून मजुरांनी इतरांना ती माहिती दिली. सांभाळणार कोण म्हणून या संस्थेचे आशिष गोस्वामी हे पिल्लांना संस्थेत घेऊन आले. प्राथमिक उपचार केल्यानंतर आता पिल्लांना जपल्या जात आहे. कौस्तुभ गावंडे हे कोवळे मांस त्यांना खाऊ घालतात.आता ती पिल्ले चांगला प्रतिसाद देत असल्याचे गावंडे सांगतात. करुणाश्रमात पिल्लांचे आगमन आनंददायी ठरले आहे. आमच्या परिवारात वाढ झाल्याने हा शुभशकुनच ठरल्याची भावना ते व्यक्त करतात.

Story img Loader