बुलढाणा : हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची हिंदुत्ववादी शिवसेना आणि धनुष्यबाण हे उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसच्या दावणीला बांधले. यामुळे आम्ही उठाव केला आणि सर्वार्थाने यशस्वी झालो. तेंव्हा ‘ते’ म्हणाले की न्यायालय, निवडणूक आयोगाने आमच्या बाजूने निकाल दिला, आता आम्ही जनतेच्या न्यायालयात न्याय मागू. एकही गद्दार निवडणुकीत जिंकणार नाही असा दावा केला. मात्र, विधानसभेच्या निवडणुकीतही जनतेनेही आम्हाला कौल दिला, भरघोस मतांनी आम्हाला विजयी केले. स्पष्ट बहुमत दिले.उलट ठाकरेंचे पानिपत झाले. त्यामुळे खरी शिवसेना आमचीच हे सिद्ध झाले, असे टिकास्त्र शिवसेना नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे केले. लाडकी बहीण योजना काहीही झालं तरी बंद पडू देणार नाही, अशी ग्वाहीसुद्धा त्यांनी दिली.
निवडणुकातील विजयाबद्धल मतदारांचे ऋण व्यक्त करण्यासाठी एकनाथ शिंदे हे आज (रविवारी) बुलढाणा जिल्ह्यात आले होते. यावेळी बुलढाणा शहरातील राजमाता जिजामाता व्यापार व क्रीडा संकुल परिसरात आयोजित आभार सभेत शिंदे बोलत होते. भाषणाच्या सुरुवातीचा भाग आणि समारोप सोडला तर मुख्यमंत्री असतानाची कामे, उद्धव ठाकरे यांच्यावरील टिकास्त्र यावरच त्यांच्या भाषणाचा रोख होता.
आज दुपारी रणरणत्या उन्हात पार पडलेल्या या सभेला केंद्रीय राज्य मंत्री प्रतापराव जाधव, पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, मृद संधारण मंत्री संजय राठोड, सभेचे आयोजक तथा बुलढाणा आमदार संजय गायकवाड, प्रवक्त्या ज्योती वाघमारे, माजी आमदार संजय रायमूलकर, शशिकांत खेडेकर, जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत, बळीराम मापारी, शांताराम दाणे, युवासेनेचे मृत्युंजय गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
तापमान चाळीस डिग्रीच्या वर असतानाही सभेला शिवसैनिकांची चांगली गर्दी जमली होती. यावेळी शिंदे म्हणाले की, आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे वारसदार आहोत. दिलेला शब्द पाळत, मी मतदारांना भेटायला आलो, आभार मानायला आलोय. माझ्यासारखा भाग्यवान नेता मीच आहे, कारण मला जनतेचे इतके प्रेम मिळाले. मुख्यमंत्री असो वा उपमुख्यमंत्री, मी कार्यकर्ता म्हणूनच काम केले आणि कार्यकर्ता म्हणूनच काम करत राहणार आहे. मला लोक ‘सीएम’ म्हणायचे, पण मी स्वतःला ‘ कॉमन मॅन’ समजत होतो, आता डीसीएम आहे, पण स्वतःला ‘डेडिकेटेड टू कॉमन मॅन ‘ समजतो. माझ्यावर टीका करण्याशिवाय ठाकरे गटाला कोणतेच कान उरले नाहीये.
मी शेतात गेलो तर टीका, गावात गेलो की टीका, काश्मीरमध्ये गेलो की तरी टीका आहेच. आता मी नेहमी घराबाहेर राहून काम करणारा हाडाचा कार्यकर्ता आहे. ते घराबाहेर पडतच नाही, बाहेर पडले की सरळ परदेशात जातात. तसेही सध्या आमच्यामुळे, आणि त्यांच्या पक्षात वेगाने सुरु असलेल्या गळतीमुळे राजकीय वातावरण तापलेले आहे. यामुळे ते थंड हवा घ्यायला गेले असावे, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरेंचा नामोल्लेख न करता लगावला.
ठाकरे गटाने जणाधार गमविल्याचे सांगून आम्ही विधानसभेत ८० जागा लढविल्या, ६० जिंकल्या, काही जागा कमी फरकाने गमावल्या. ठाकरेंनी १०० जागा लढविल्या अन २० जागा जिंकल्या. अडीच वर्षांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात केलेला विकास व लाडकी बहीण सारख्या योजनामुळे महायुतीला बहुमत मिळाल्याचा दावा शिंदेनी यावेळी केला.
पहेलगाम येथील अतिरेकी हल्ला हा देशावरील हल्ला असल्याचे सांगून आता पाकड्यांचे कंबरडे मोडले पाहिजे ही करोडो भारतीयांप्रमाणे आमचीही इच्छा आहे. मी काशिमराला जाण्यापूर्वी खासदार श्रीकांत शिंदे तिथे पोहोचले. मी गेल्यावर ‘त्यांनी’ टीका केली. आम्ही तिथे मदतीसाठी गेलो, विमानाने लोकांना राज्यात आणले, इतरांसारखे लांबून सांत्वन करणारे आम्ही नाही, असा टोला त्यांनी लगावला.
यावेळी केंद्रीय मंत्री जाधव, गुलाबराव पाटील यांची समायोचित भाषणे झाली. आमचे नेते मतदारांचे आभार मानायला आले. पण खरं तर त्यांनी मुख्यमंत्री असताना दिलेल्या कोट्यवधींचा निधी अन त्यातून झालेली विकासकामे याबद्धल आम्हीच त्यांचे आभार मानायला हवे, असा समान सूर त्यांनी आळवला. आमदार संजय गायकवाड यांनी मतदारसंघातील विकासाचा आढावा घेत याबद्धल शिंदेचे आभार मानले. संचालन अनिल रिंढे यांनी केले.