वर्धा: गरजू गरिबांसाठी छोटेसे घरकुल असण्याचे स्वप्न पंतप्रधान घरकुल योजनेतून साकार करण्याचा प्रयत्न होतो. पण जिल्ह्यात तीस हजारावर घरकुल प्रलंबित आहे. त्यामुळे पडक्या झोपडीत राहणाऱ्या अनेकांची पावसात दैना उडते पण मदत मागायची सोय नसते. गळणाऱ्या घरात संसार चालविणाऱ्यांचे हाल पाहून युवा परिवर्तन या संघटनेने शेकडो कुटुंबांना घरावर टाकण्यासाठी मोफत ताडपत्री देणे सुरू केले आहे.
ताडपत्री वाटप मदत नसून मोहीम असल्याची भावना संघटनेचे निहाल पांडे यांनी व्यक्त केली. गोरगरीब लोकांना हक्काचे घर मिळाले पाहिजे. त्यांचा गळका संसार सावरला पाहिजे व सरकारला याची लाज वाटली पाहिजे, असा हेतू असल्याचे ते म्हणाले. आम्ही तर मदत देतच आहोत पण ज्यांना शक्य असेल त्यांनी गरिबांच्या झोपडीवर असे पांघरून घालावे, असे आवाहन आज करण्यात आले.