लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर : अल्झायमर अर्थात स्मृतिभ्रंशाचे मूळ कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही. परंतु या आजारात वय वाढणे हा सर्वात मोठा जोखमेचा घटक ठरत आहे. या आजाराचे सर्वाधिक रुग्ण ६५ वर्षांवरील असल्याचे निरीक्षण वर्ल्ड फेडरेशन ऑफ न्यूरोलॉजी संघटनेने नोंदवले आहे. २१ सप्टेंबरला जागतिक अल्झायमर दिन असून त्यानिमित्त घेतलेला हा आढावा.

जगात दर ३ सेकंदाला एका व्यक्तीला स्मृतिभ्रंश होतो. भारतात सुमारे ९० लाखांच्या जवळपास रुग्ण आहेत. या आजारावर सध्या कोणताही उपचार नाही. परंतु पहिल्या टप्प्यातच आजाराचे निदान करून योग्य औषधांनी आजाराला वाढण्यापासून थांबवता येऊ शकते. मेंदू आणि शरीराची काळजी घेणारी निरोगी व संतुलित जीवनशैली तसेच नियमित व्यायाम व चांगल्या आहारातून हा आजार नियंत्रित होतो. उच्च रक्तदाब, लठ्ठपणा धूम्रपान, वायू प्रदूषण, मधुमेह, जास्त मद्यपान, खराब आहार, नैराश्य, सामाजिक वेगळेपण, कमी शिक्षण, तसेच डोक्याच्या दुखापतीपासून संरक्षणासाठी विशेष काळजी घेण्याची गरज असल्याचे वर्ल्ड फेडरेशन ऑफ न्यूरॉलॉजीचे विश्वस्त डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी सांगितले.

आणखी वाचा-वर्धा: युवतीवर अत्याचार करणाऱ्यावर गुन्हा दाखल, पण त्याच दिवशी…

रुग्णवाढ चिंताजनक

स्मृतिभ्रंशाचे सर्वाधिक रुग्ण ६५ हून जास्त वयोगटातील आहेत. परंतु या आजाराच्या निदानाच्या सुमारे २० वर्षांपूर्वीपासून या आजाराची प्रक्रिया सुरू होते. मानवाचे जसजसे आयुर्मान वाढत आहे, तसतसे या आजाराचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. काही अज्ञात कारणांमुळे स्त्रियांमध्ये हा आजार अधिक आहे. या आजारात मेंदूच्या पेशी खराब होतात आणि कालांतराने मेंदू आकुंचन पावत असल्याचेही बघायला मिळाले आहे.

लक्षणे काय?

अलीकडे माहिती विसरणे ही स्मृतिभ्रंशााची सर्वात सामान्य तक्रार आहे. सोबत महत्त्वाच्या तारखा किंवा कार्यक्रम विसरणे, वारंवार प्रश्न विचारणे, घराचा मार्ग विसरणे, वाचण्यात अडचण, नातेवाईक आणि मित्र ओळखण्यात अक्षमता, नातेसंबंधात समस्या ही स्मृतिभ्रंशाची लक्षण आहे.

आणखी वाचा-अमरावती विभागातील सिंचन प्रकल्‍पांमध्‍ये ७७.१८ टक्‍के जलसाठा

जोखमीची कारणे?

जे लोक उच्च कार्बोहायड्रेट आहार, साखर, जंक फूड, पॅकेज अन्न, कोल्ड ड्रिंक्स, स्वयंपाकासाठी जास्त तेल वापरतात त्यांना स्मृतिभ्रंशाचा धोका जास्त असतो. मेंदूच्या आरोग्यासाठी शारीरिक आणि मानसिक व्यायाम महत्त्वाचे आहेत. तंबाखू, धूम्रपान आणि अल्कोहोलपासून दूर राहणे, मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचे योग्य उपचार, नवीन गोष्टी शिकणे, छंद विकसित करणे आणि सामाजिक कार्यात रस घेणे ही स्मृती जपण्यासाठी आणि स्मृतिभ्रंश टाळण्यासाठी गरजेचे असल्याचेही डॉ. चंद्रशेखर मेश्राम म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: People over the age of 65 are at the highest risk of dementia mnb 82 mrj