गोंदिया : गोंदिया जिल्हा निर्मितीला २४ वर्षे पूर्ण झाले त्यानंतर जिल्ह्याचा वाढता व्याप बघता आणि भंडारा येथील केंद्रीय कारागृहाची बंदी क्षमता लक्षात घेता गोंदियात कारागृह उभारण्याच्या हालचाली २०११-१२ साली सुरू झाल्या. प्रस्तावही तयार झाला. मात्र गेल्या १० वर्षांपासून हा प्रस्ताव केवळ कार्यालयीन भ्रमंतीवरच आहे. यामुळे कारागृह निर्मितीच्या हालचाली थंडावल्या असून त्याकडे लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गोंदिया जिल्ह्यात भंडारा जिल्ह्यापेक्षा गुन्ह्याचे प्रमाण अधिक आहे. दर महिन्याला सरासरी दीडशे आरोपींना गोंदियातून भंडारा येथील कारागृहात पाठविले जाते. यासाठी पोलीस बळ व पैसाही खर्च होतो. आरोपी अधिक किंवा अट्टल गुन्हेगार असल्यास वाहन व पोलीस कुमकची स्वतंत्र व्यवस्था करावी लागते. त्यातच संधी साधून कैदी पळून जाण्याची भितीही असते आणि गत काळात अशा घटनादेखील घडल्या आहेत. सर्व परिस्थिती पाहता गोंदियात कारागृहाची निर्मिती आवश्यक आहे.

हेही वाचा – यवतमाळ: पर्यटन मंत्रालयाच्या योजनांचे आमिष; फसवणुकीचा आकडा सव्वा कोटींच्या घरात

शासनाने २०११ – १२ मध्ये गोंदियात ‘वर्ग एक’चे कारागृह तयार करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. त्यानंतर जागा पाहण्याच्या हालचाली झाल्या. तत्कालीन कारागृह अधीक्षक बदलून गेल्याने प्रस्ताव पडून राहिला. नंतर राज्य शासनाच्या नगररचना विभागाने गोंदियात वर्ग २ च्या कारागृहाला मंजुरी देत जागेचा शोध घेण्याचे पत्र काढले. त्यानुसार जागेची पाहणी झाली. येथील कारंजा पोलीस मुख्यालय परिसरात जिल्हा कारागृह निर्मिती करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. बांधकाम अंदाजपत्रक आराखडा तयार झाला. इमारत बांधकामासाठी खर्चाचा अहवाल शासनाने मागविला. यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने आराखडा तयार केला. ३०० कैद्यांची क्षमता असलेले कारागृह निर्माण होणार होते. मात्र, दशकभराचा काळ लोटूनही गोंदियाला कारागृह मिळू शकले नाही. यासाठी तत्कालीन शासन, प्रशासन व लोकप्रतिनिंधींचे प्रयत्न कमी पडले असावे, असेच म्हणावे लागेल.

श्रम व पैसाही खर्च

गोंदिया जिल्ह्यातील गुन्हेगारीचे प्रमाण लक्षात घेता येथे जिल्हा कारागृह होणे गरजेचे आहे. सद्यस्थितीत भंडारा कारागृहात अडीचशेवर गोंदिया जिल्ह्यातील आरोपी आहेत. त्यांना दर महिन्याला पेशीवर नेणे-आणणे करावे लागते. त्यात वेळ आणि श्रम तसेच पैसादेखील खर्च होतो. गोंदियात कारागृह झाल्यास या सर्वांची बचत होणार आहे.

हेही वाचा – यवतमाळ: अल्पवयीन मुलीस पैसे देण्याच्या बहाण्याने घरी बोलावून विनयभंग, आरोपीवर गुन्हा दाखल

भंडारा कारागृहावर भार

गोंदिया येथे कारागृह नसल्याने येथील कैद्यांना भंडारा कारागृहात पाठविले जाते. तेथील कारागृहाची क्षमता ३५० कैद्यांची आहे. आज स्थितीत या कारागृहात ४०० पेक्षा अधिक कैदी आहेत. काही दिवसांपूर्वी ही संख्या ५५० च्या आसपास होती. विशेष म्हणजे, सध्या स्थितीत २५० पेक्षा अधिक कैदी गोंदिया जिल्ह्यातील असल्याची माहिती आहे.

जिल्हा कारागृह निर्मितीचा यापूर्वीचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाकडे होता, आता तो पोलीस हाऊसिंग बोर्डाकडे वळविण्यात आला आहे. यावर समिती निर्णय घेणार आहे. – निखिल पिंगळे, जिल्हा पोलीस अधीक्षक, गोंदिया

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: People representatives neglecting the issue of construction of gondia district jail sar 75 ssb
Show comments