भंडारा: साकोली तालुक्यातील स्मार्ट ग्रामपंचायत वलमाझरी येथे संपूर्ण कर भरणाऱ्या व्यक्तींना आता विमानवारी घडवली जाणार आहे. तसा निर्णय ग्रामपंचायतने २३ एप्रिलला झालेल्या ग्रामपंचायतच्या मासिक सभेत घेतला आहे.

साकोली तालुक्यातील खैरी-वलमाझरी ही ग्रामपंचायत खैरी, वलमाझरी, पिटेझरी आणि आमगाव अशा चार गाव मिळून गटग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायतीला आतापर्यंत अनेक पुरस्कार प्राप्त झाले असून संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत राज्यस्तरीय तसेच केंद्र शासनाचा स्मार्ट ग्राम पुरस्कार सुद्धा मिळाला आहे. या ग्रामपंचायत अंतर्गत चारही गावात वर्षभर विविध उपक्रम राबविण्यात येत असून त्याला लोकांचाही तेवढाच भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

गावातील लोकात ही भावना कायम राहावी आणि आपले गाव स्वच्छ, निरोगी, सुंदर व सदा हरित राहण्यासाठी सरपंच पुरुषोत्तम रुखमोडे जनतेसाठी नवनवीन कल्पना राबवित असतात. त्यांच्या या कामाला त्यांचे ग्रामपंचायत पदाधिकारी, कर्मचारी, सचिव, गावातील वरिष्ठ नागरिक आणि गावकरी सहकार्य करीत असतात.

खैरी-वलमाझरी ग्रामपंचायतमध्ये २३ एप्रिलला पार पडलेल्या मासिक सभेत असा ठराव घेण्यात आला की, सन २०२५-२०२६ चे सर्व प्रकारचे घर कर व पाणी पट्टी कर व त्यापूर्वीचे सर्व कर दि. १५ मे २०२५ पर्यंत जे लाभार्थी भरतील अशा लाभार्थ्यांचा लकी ड्रॉ काढण्यात येईल. या लकी ड्रॉमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त करणाऱ्या कुटुंबातील कोणत्याही एका व्यक्तीला नागपूर ते हैदराबाद विमान प्रवास, तिथे राहण्याची व्यवस्था आणि परत येतांना रेल्वेचा वातानुकुलीत प्रवास अशी संधी दिली जाईल.

तसेच व्दितीय क्रमांकाला १०० किलो जय श्रीराम तांदूळ, तृतीय कमांकला कुटुंबातील ५ लोकांना नागझिरा अभयारण्याची सफारी, चौथा क्रमांकाला २० किलो तुरीची डाळ, पाचव्या क्रमांकला एक टिन खादय तेल आणि सहाव्या क्रमांकला एक चांदीचा शिक्का असे बक्षीस देण्याचा निर्णय ग्रामपंचायतने घेतला आहे.

यासोबतच ड्रॉ बरोबर सर्व कर भरणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला मोफत कणिक दळून दिली जाईल. मोफत आरोचे शुद्ध पाणी सुद्धा देण्यात येणार आहे. त्यामुळे या ग्रामपंचायत अंतर्गत चारही गावातील कुटुंब आता संपूर्ण कर भरण्याच्या तयारीला लागले असून त्यांच्यात स्पर्धा निर्माण झाली आहे. ग्रामपंचायतचा हा निर्णय गावाच्या विकासात एक पाऊल पुढे नेणारा ठरल्याने सर्वत्र या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

प्रतिक्रिया…

खैरी-वलमाझरी ग्रामपंचायतीच्या चारही गावात उत्तम आरोग्य, स्वच्छता कायम राहावी, गाव सदाहरित राहावे, मुलांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावे या व इतर गोष्टीसाठी आमचा पुढाकार आहे आणि जनताही सहकार्य करीत आहे. केवळ पुरस्कार मिळावे हा आमचा उद्देश नाही. येणाऱ्या दिवसात खैरी-वलमाझरी ग्रामपंचायतला राज्यतच नव्हे तर संपूर्ण देशात ओळखली जाईल असे काही करण्याचा आमचा मानस आहे.
पुरुषोत्तम रुखमोडे, सरपंच.