वाशीम: परळी येथील पोलीस कोठडीत युवकाच्या मृत्यू संबंधी दोषी पोलीस अधिकारी यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करावा, बोराळा येथील वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता विश्वास कांबळे यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी, अनु. जाती, जमाती, मुस्लिम समुदायातील युवकांवर अन्याय, अत्याचार करणाऱ्यांवर कारवाई करावी, आळंदी येथे वारकरी संप्रदायावर लाठीचार्ज करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून सेवेमधून बडतर्फ करावे, काटा येथील युवतीच्या हत्या प्रकरणातील आरोपीला अटक करावी. यासह इतर मागण्यासाठी वंचीत बहुजन आघाडीने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.
जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात संपूर्ण महाराष्ट्रातील गायरान, अतिक्रमण जमिनीचे पट्टे व गावातील घरांची नोंद करूनरमाई आवास योजनेमधून घरकुल द्यावे आदी मागण्या करण्यात आल्या. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथून वंचित बहुजन आघाडी चे प्रदेश उपाध्यक्ष तथा प्रदेश प्रवक्ते फारुख अहेमद यांच्या नेतृत्वात मोर्चाला सुरूवात झाली.
हेही वाचा… जिल्हा परिषद उपाध्यक्ष संदीप टाले ‘नॉट रिचेबल’.. पद वाचविण्यासाठी भाजपला शरण?
महिला आघाडी महासचिव तथा जिल्हा प्रभारी अरुंधती सिरसाट, प्रदेश उपाध्यक्ष महिला आघाडी डॉ. गजाला खान, प्रदेश सदस्या महिला आघाडी किरण गिर्हे, पश्चिम विदर्भ अध्यक्ष डॉ. सिद्धार्थ देवळे, जिल्हाध्यक्ष डॉ. गजानन हुले, जिल्हा महासचिव सोनाजी इंगळे, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ भगत, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष ज्योति इंगळे, रिसोड विधानसभा समन्वयक परितोष इंगोले, जिल्हा मार्गदर्शक दत्तराव गोटे, सुभाषराव राठोड यांच्या सह मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.