नागपूर : पूर्वी गुन्हेगारी म्हटले की पुरुषांचीच नावे ठळकपणे समोर यायची. महिलांचा गुन्ह्यांमध्ये फारसा सहभाग नसायचा. मात्र, आता हे चित्र वेगाने बदलताना दिसत आहे. महिलांचा गुन्हेगारीतील सक्रिय सहभाग आश्चर्यकारकरित्या वाढतोय. उपराजधानीत गेल्या नऊ महिन्यांत दाखल झालेल्या विविध प्रकारच्या गुन्ह्यात दोनशेपेक्षा जास्त महिलांना पोलिसांनी अटक केली आहे.
खून, खुनाचा प्रयत्न करणे, आर्थिक फसवणुकीत सहभागी असणे, कट रचण्यात सहभागी असणे, बलात्कारासारख्या गुन्ह्यात पुरुष आरोपींना सहकार्य करणे अशा गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यांत या महिलांना अटक झाली आहे. आधी महिलांवरील लैंगिक अत्याचारासारख्या गुन्ह्यांमध्ये महिला आरोपींचा सहभाग नसायचा. मात्र, आता बलात्कार, विनयभंग अशा गुन्ह्यांमध्येही त्या पुरुषांना सहकार्य करीत असल्याचे पोलिसांच्या नोंदीवरुन समोर आले आहे. यासोबतच आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यातही महिलांचा सहभाग वाढला आहे. जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांत ६३ महिलांना अटक करण्यात आली होती. पुढे हा आकडा आणखी वाढला. मे ते सप्टेंबर अखेरपर्यंत तब्बल १४० महिलांना अटक करण्यात आली. जून आणि जुलै या दोन महिन्यात ७२ महिलांना अटक करण्यात आली.
आणखी वाचा-तीन वर्षांपासून जलसंपदा विभागात अधीक्षक अभियंता पदाची पदोन्नती रखडली
साडेतीन हजारांवर पुरुषांना अटक
गेल्या नऊ महिन्यांत नागपुरातील सर्वच पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात ३ हजार ७५६ आरोपींना पोलिसांनी अटक केली. यामध्ये सर्वाधिक आरोपी चोरी, घरफोडी, दरोडा, बलात्कार, आर्थिक फसवणूक, खून आणि खुनाचा प्रयत्न करणे या गुन्ह्यांतील आहेत. तसेच अंमली पदार्थ विक्री आणि देहव्यापाराशी संबंधित गुन्ह्यातही मोठ्या प्रमाणात पुरुष आरोपींना अटक करण्यात आली आहे.
“गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यात नियमानुसार महिला आरोपींनाही अटक करावी लागते. गुन्ह्याचे स्वरुप बघून महिला आरोपींना अटक करण्यात येते.” -डॉ. अभिजीत पाटील, सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा.