लोकसत्ता टीम
नागपूर : गोरेवाडा बचाव केंद्रात काही दिवसांपूर्वी तीन वाघ आणि एका बिबट्याच्या अचानक झालेल मृत्यूने खळबळ उडाली. त्यांच्या अवयवाच्या नमुन्याची तपासणी केल्यानंतर ‘एच-५एन-१’ या विषाणूमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. गोरेवाडा बचाव व उपचार केंद्रासह भोपाळच्या संस्थेनेही त्यावर शिक्कामोर्तब केले. दरम्यान, प्राणीसंग्रहालयाने थेट वाघांच्या ‘मटण पार्टी’वरच बंदी आणली आहे.
भारतात पहिल्यांदाच या विषाणूची लागण वाघांना होऊन त्यामुळे वाघ मृत्यूमुखी पडल्याने हे कोडे अजूनही सुटलेले नाही. आजतागायत वाघांना या विषाणूची लागण झाल्याचे ऐकिवात नव्हती किंवा तशी नोंदही नाही. त्यामुळे वाघ आणि बिबट्याला या विषाणूची लागण झालीच कशी, याचा स्पष्ट खुलासा अजूनही कुणालाच करता आलेला नाही. गोरेवाडा बचाव केंद्रात आणलेले हे तिनही वाघ ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या लगतच्या क्षेत्रातून आणले होते. बाहेर असणारे हे वाघ गावातील पाळीव जनावरे, कोंबड्या तसेच इतर वन्यप्राण्यांची शिकार करतात. या वाघांनी आधीच या विषाणूची लागण झालेल्या कोंबड्या खाल्या आणि त्यामुळेच त्यांना या विषाणूची लागण झाली असावी, असाही एक अंदाज काही लोक जुळवून पाहात आहेत.
आणखी वाचा-चांदीच्या दरात घसरण… सोन्याच्या दराने…
मात्र, वनमंत्री गणेश नाईक यांनी त्यांच्या चंद्रपूर दौऱ्यादरम्यान गोरेवाडा बचाव केंद्राच्या अधिकाऱ्यांना बोलावले आणि कोंबडीच्या मटणातून त्यांना ही लागण झाली का, याची सत्यता तपासली जाईल असे सांगितले. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखील प्राणीसंग्रहालयांना खाद्य तपासून घेण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणाच्या सखोल चौकशीनंतर काय निष्पन्न होईल ते पाहावे लागेल, असे वनमंत्री म्हणाले. दरम्यान, या प्रकरणाची दखल वनमंत्र्यांनी सुद्धा घेतल्याने प्राणीसंग्रहालयातील प्राण्यांना कोंबडीचे मांस द्यावे की नाही, या विचारात ते पडले आहेत. कारण प्राणीसंग्रहालयात वेगवेगळे प्राणी आहेत आणि या प्रत्येक प्राण्याचे खाद्य वेगळे आहेत. यात कोंबडीचे मांस, बैलाचे मांस यासह खेकडे, मासे, झिंगे, अंडी दिली जातात. वाघांना कोंबडीचे मांस सहजासहजी दिले जात नाही. मात्र, तरीही सत्यता तपासण्याचे निर्देश दिल्यामुळे प्राणीसंग्रहालयात कोंबडीचे मांस आणावे की नाही या विचारात ते पडले आहेत. भोपाळ येथील पशुवैद्यकीय प्रयोगशाळेने दिलेल्या अहवालानंतर इतर प्राण्यांना लागण होऊ नये, त्यासाठी प्राण्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.