नागपूर : शहरातील प्रसिद्ध तेलंगखेडी गार्डनमध्ये आयोजित कॉकटेल महोत्सवाचा समाजमाध्यमावर गाजावाजा केल्यानंतर परवानगी नाकारण्यात आल्याने या मोहत्सवाचा फज्जा उडला आहे.तेलंगखेडी उद्यान वारसा स्थळ आहे  तेथे कंत्राटदाराने कॉकटेल महोत्सव आयोजित केल्याचा प्रचार समाजमाध्यमावर सुरू केला होता. हे उद्यान कृषी विद्यापीठाच्या अखत्यारित येत असून तेथे अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करणे बेकायदेशीर आहे. या संदर्भात वाच्यता झाल्यावर  कृषी विद्यापीठाने चौकशीचे आदेश दिले असून असे काही तिकडे होणार असेल तर कंत्राटदारासोबतचा भाडेकरार रद्द करण्यात येईल, असे डॉ. पंजाबराव कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता विलास अतकरे यांनी स्पष्ट केले.

राजे रघुजी भोसले (द्वितीय) यांच्या काळातील हे तेलंगखेडी उद्यान आहे. येथील तलाव २४५ वर्षांपूर्वीचा आहे. वारसा स्थळाचा दर्जा असलेल्या तेलंगखेडी तलाव आणि उद्यान सध्या कंत्राटदाराच्या हाती आहे. कृषी विद्यापीठाने त्याला भाड्याने दिले आहे. या कंत्राटदाराने या उद्यानात कॉकटेल महोत्सव आयोजित करण्याचा घाट घातला होता. विशेष म्हणजे, या महोत्सवाची परवानगी घेण्यात आली नव्हती. ही बाब कृषी महाविद्यालयाने गांभीर्याने घेतली आहे.

कंत्राटदाराने १६ आणि १७ फेब्रुवारीला कॉकटेल महोत्सवाचे आयोजन केले होते. त्यासाठी त्यांनी पोलीस प्रशासन आणि उत्पादन शुल्क विभागाकडे परवानगीचा अर्ज केला होता. परंतु, कृषी विद्यापीठाची परवानगी मागितली नव्हती. तसेच येथील आयोजनाबद्दल समाजमाध्यमातून माहिती देण्यात आली होती. आता हा कार्यक्रम रद्द झाल्याची माहिती आहे.

वाट्टेल तसा वापर करता येणार नाही

उद्यान वारसा स्थळ आहे. जर ते भाड्याने दिले असले तरी त्याचा वाट्टेल तसा वापर करता येऊ शकत नाही. कॉकटेल महोत्सव आयोजित केल्यास भाडेकरार रद्द करण्यात येईल, असे अतकरे म्हणाले.

शहरातील तेलंगखेडी उद्यानात १५ व १६ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या ‘कॉकटेल महोत्सव’बाबत प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अंतिम परवानगी मिळालेली नसताना आयोजकांनी परवानगी मिळण्यापूर्वीच शहरभर महोत्सव आयोजित करण्याचे ‘होर्डिंग’ लावले आहे. तेलंगखेडीसारख्या सरकारी उद्यानात दारूशी संबंधित कोणत्याही कार्यक्रमाला परवानगी नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे, मात्र असे असतानाही परवानगी मिळण्यापूर्वीच आयोजकांनी परवानगीसाठी अर्ज करून आपला कार्यक्रम जाहीर केला. एवढेच नाही तर त्याची तिकिटे समाजमाध्यमांवर आणि ऑनलाईनही विकली जात आहेत. याबाबत पोलीस उपायुक्त राहुल मदने म्हणाले, आयोजकांनी परवानगीसाठी अर्ज केला आहे, जो पोलीस आयुक्त यांच्याकडे पाठवला आहे. आयुक्तालयातून अंतिम निर्णय घेण्यात येईल. या कार्यक्रमाला परवानगी देण्यात आलेली नाही.

Story img Loader