बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुका मागील आठवड्यापासून केस गळतीच्या अनामिक आजाराने त्रस्त असतानाच आज भरदिवसा आठवडी बाजारात एकाची निर्घृण हत्या करण्यात आली.तालुक्यातील माटरगाव येथील आठवडी बाजारामध्ये शेत जमिनीच्या जुन्या वादावरून एका इसमाने कुऱ्हाडीने सपासप वर करून चुलत भावाचा मुडदा पाडला. यावेळी एक नातेवाईक महिला देखील गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत असून तिची प्रकृती अत्यवस्थ असल्याचे वृत्त आहे.
पोलीस आणि स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शेगाव तालुक्यातील माटरगाव येथे आज शुक्रवारी आठवडी बाजार भरतो. आज नेहमीप्रमाणे सकाळ पासून आठवडी बाजार भरला. अचानक दोन चुलत भावात वाद झाला. काय होत आहे ते समजण्यापूर्वीच एकाने चुलत भावावर कुऱ्हाडीने वार करणे सुरु केले. मध्ये पडलेल्या महिलेला देखील त्याने सोडले नाही. मोठा रक्तस्त्राव झाल्याने त्या इसमाचा जागीच मृत्यू झाला तर महिला गंभीर जखमी झाली. यानंतर मारेकरी आठवडी बाजारातून पसार झाला. त्याचे रौद्ररूप पाहून त्याला अडवण्याची कोणी हिंमत देखील केली नाही.
हेही वाचा…जागावाढीच्या मागणीवरून ‘एमपीएससी’च्या दोन गटांमध्ये संघर्ष का सुरू आहे? ही आहेत कारणे
जलंब पोलीस ठाणे अंतर्गत येत असलेल्या माटरगाव येथील आठवडी बाजारामध्ये झालेल्या या भीषण हल्ल्यात भास्तन (तालुका शेगाव जिल्हा बुलढाणा )येथील शत्रुघ्न मिरगे जागीच ठार झाले. मिरगे यांची साळी सुद्धा गंभीर जखमी झाली. घटनेची माहिती मिळताच जलंब पोलीस ठाण्याचे ठाणेदार अमोल सांगळे व त्यांचे सहकारी पोलीस कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. गंभीर जखमी महिलेला पोलीस वाहनात बसवून उपचारासाठी रवाना करण्यात आले. हे वृत्तलिहीपर्यंत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरु होती. फरार मारेकऱ्याचा कसोशीने शोध घेण्यात येत आहे. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी, श्वान पथक दाखल झाले आहे.