नागपूर : गावापासून दोन किलोमीटर जंगलात गुरे चारायला गेलेल्या एका शेतकऱ्याचा अज्ञात आरोपीने कुऱ्हाडीने हल्ला करुन खून केला. सायंकाळ झाल्यावर गुरे घरी परतली. मात्र, गुरे चारणारा व्यक्ती घरी आला नाही. कुटुंबीय चिंतेत पडल्यानंतर घरातील पाळीव श्वान भुंकत जंगलाच्या दिशेने पळायला लागला. त्यामुळे कुटुंबीयसुद्धा श्वानाच्या मागे निघाले.
एका तलावाजवळ गेल्यानंतर अंधारात मालकाच्या मृतदेहाजवळ श्वान थांबला. या घटनेनंतर कळमेश्वर पोलिसांनी हत्याकांडाचा गुन्हा दाखल केला. मात्र, श्वानाच्या स्वामीनिष्ठेची गावात चर्चा होती. देवीदास ऊर्फ गजू चचाणे (वय ५८, रा. पिलकापार) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
कळमेश्वर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवीदास चचाणे हे पत्नी व दोन मुलांसह पिलकापार येथे राहतात. घरी थोडीफार शेती असून जोडधंदा म्हणून ते दुग्धव्यवसाय करतात. घरातील गायी-म्हशींना देवीदास रोज जंगलात चारायला घेऊन जात होते. नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी अकरा वाजता गायी-म्हशी घेऊन गावापासून दोन किमी असलेल्या जंगलात घेऊन गेला. खुर्सापार तलावाजळ देवीदास हे गायी-म्हशी चारत होते. सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास कुणीतरी अज्ञात आरोपीने देवीदास यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला.
या हल्ल्यात देवीदास यांचा मृत्यू झाला. आरोपीने तलावाजवळच मृतदेह फेकून पळ काढला. सायंकाळी गायी-म्हशी घरी परत आल्या. मात्र, देवीदास हे घरी परतले नाही. त्यामुळे कुटुंबीय चिंतेत पडले. दरम्यान, देवीदास यांनी पाळलेला श्वान भुंकायला लागला. देवीदास यांचा मोठा मुलगा दर्शन याच्या हातातील दोरी तोंडात पकडून बाहेर न्यायला लागला. त्यामुळे दर्शन आणि अन्य कुटुंबीय श्वानाच्या मागे निघाले.
खुर्सापार तलावापर्यंत श्वान भुंकत गेला. काही अंतरावर जाऊन थांबला. अंधारात सर्व जण श्वानाजवळ पोहचले. तेथे देवीदास यांचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह दिसून आला. दर्शनने कळमेश्वर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांचे पथक घटनास्थळावर पोहचले. हितज्योती फाऊंडेशनचे हितेश बन्सोड यांनी मृतदेह कळमेश्वर येथील शासकीय रुग्णालयात पोहचवला. तक्रारीवरुन हत्याकांडाचा गुन्हा दाखल केला. आरोपीचा शोध पोलीस घेत आहे.
हत्याकांडाचे गुढ कायम
देवीदास यांना दारुचे व्यसन होते. ते अनेकदा जंगलात जाऊन दारु पित होते. गुरे कुणाच्यातरी शेतात गेली असावी, त्यावरुन वाद होऊन देवीदासचा खून करण्यात आला असावा. तसेच दारु पिताना मित्रासोबत वाद झाला असावा, त्यातून हे हत्याकांड घडले असावे, अशी शक्यता कळमेश्वर पोलिसांनी वर्तवली आहे.
लवकरच उलगडा?
देवीदास यांच्या खुनाचे कारण अद्याप गुलदस्त्यात असून काही संशयितांवर आम्ही नजर ठेवली आहे. लवकरच या हत्याकांडाचा उलगडा होईल, अशी प्रतिक्रिया आयपीएस अधिकारी अनिल म्हस्के यांनी दिली.