वर्धा : उत्पन्नाचा दाखला व अन्य प्रमाणपत्रांसाठी ऑनलाईन सेंटर सुरू झाले आहे. त्यास मिळणारा प्रतिसाद पाहून अमरावतीच्या विकास कुंभेकर याने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात व्ही.एस. ऑनलाईन सर्व्हिस सेंटर सुरू केले होते. या ठिकाणी तो गरजेची विविध शासकीय प्रमाणपत्रे भरमसाठ शुल्क आकारून तयार करायचा. महाविद्यालयीन विद्यार्थी नितीन मुकुंद सुळे याने इथूनच उत्पन्नाचा दाखला काढला. तो महाविद्यालयीन पडताळणीत बनावट असल्याचे सिद्ध झाले.
हे माहीत होताच त्याच्या वडिलांनी थेट ते प्रमाणपत्र जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांना व्हॉट्सअॅपवर पाठविला. तहसीलदार रमेश कोळपे यांनी पोलिसांची मदत घेत या ऑनलाईन सेंटरवर छापा टाकला. त्यावेळी बनावट शपथपत्र व अन्य कागदपत्रे आढलून आली. तसेच यावेळी तीन लॅपटॉप, प्रिंटर, एक चारचाकी जप्त करण्यात आली.
हेही वाचा – चंद्रपूर : आदिम कोलाम समाजातील ७७ टक्के लोकांना त्यांचे लोकप्रतिनिधी माहिती नाही
हेही वाचा – विदर्भातील दोन गिर्यारोहकांनी ‘माऊंट युनाम’ शिखरावर फडकवला तिरंगा
आरोपी कुंभेकर हा शासकीय अधिकाऱ्यांच्या डिजिटल स्वाक्षरी कॉपी करीत त्या प्रमाणपत्रावर पेस्ट करीत होता. गत अनेक महिन्यांपासून तो हा गोरखधंदा करीत असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याला, तसेच त्याची पत्नी व दोन ऑपरेटर अश्या चौघांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत महआईटी, माहिती तंत्रज्ञान, महसूल विभागाचे अधिकारी सहभागी झाले होते.