नागपूर: तलाठी भरती परीक्षा अखेर १४ सप्टेंबरला संपली. १० लाख ४१ हजार उमेदवारांपैकी आठ लाख ६४ हजार उमेदवारांनी ही परीक्षा दिली. निकाल दिवाळीपूर्वी लावण्यासाठी भूमी अभिलेख विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र सुरुवातीपासूनच तलाठी भरतीमध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचा आरोप करणाऱ्या स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने या परिक्षेसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे निकालाची अपेक्षा असताना आता परीक्षेवर स्थगिती येण्याची शंका उपस्थित केली जात आहे.
हेही वाचा >>> भारत-कॅनडामध्ये तणाव; कृषी, शेतकऱ्यांसह अन्नसुरक्षेवर दबाव!
स्पर्धा परीक्षा समितीचे निलेश गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, तलाठी भरती घोटाळा आणि इतर नोकर भरती मधील पेपरफुटी घोटाळ्याबाबत अनेक पुरावे समितीकडे आहेत. सरकारला वारंवार निवेदने आणि विनंत्या करूनही नोकर भरती घोटाळ्याबाबत सरकारने कोणताही ठोस निर्णय घेतला नाही. त्यामुळे ॲड. मनोज पिंगळे यांच्यामार्फत स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावर न्यायालय काय निर्णय देते याकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत. तलाठी भरती परीक्षेसाठी साडेअकरा लाखांपेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज भरले होते. छाननीअंती ४४६६ जागांसाठी दहा लाख ४१ हजार ७१३ अर्ज वैध ठरले. त्यापैकी आठ लाख ६४ हजार ९६० उमेदवारांनी परीक्षा दिली. या उमेदवाराना न्याय मिळवून देण्यासाठी हा लढा असल्याचे समन्वय समितीने सांगितले आहे.