लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चंद्रपूर : मनसे कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार यांच्यावरील गोळीबाराच्या घटनेनंतर आता बल्लारपूर शहरात कापड व्यावसायिक यश व अभिषेक मालू यांच्या कापड दुकानात पेट्रोल बॉम्ब फेकून स्फोट घडवून आणण्यात आला व नंतर गोळीबार केल्याने खळबळ उडाली आहे. या गोळीबारात मालू यांच्या दुकानात काम करणाऱ्या कार्तिक साखरकर नावाच्या नोकरांच्या पायाला गोळी लागल्याने गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान या पेट्रोल बॉम्ब स्फोट व गोळीबाराचा व्यापारी संघटनेने तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे.

बल्लारपूर बस्ती वॉर्डात यश व अभिषेक मालू यांचे शॉपिंग मॉल आहे. रविवारी सकाळी दुकान उघडण्यासाठी मालू यांनी नोकर कार्तिक व महेंद्र यांना दुकानाची चाबी दिली. त्यानंतर दोन्ही नोकरांनी दुकान उघडले. दरम्यान यावेळी हल्लेखोर दुकान जवळ यश व अभिषेक मालू यांची वाटच बघत बसले होते. दोन्ही नोकरांनी दुकान उघडले तेव्हा हल्लेखोरांना वाटले हेच दोघे यश व अभिषेक मालू आहेत. त्यामुळे दुकानाच्या आत पेट्रोल बॉम्ब टाकला व गोळीबार केला. यातील एक गोळी नोकर कार्तिक याच्या पालया लागली. यानंतर हल्लेखोर पळून गेले. दरम्यान गोळीबारचा आवाज ऐकताच सर्वजण सैरावैरा पाळायला लागले. या गोळीबार मध्ये मालू यांच्या दुकानात काम करणाऱ्या कार्तिक साखरकर नावाच्या कर्मचाऱ्यास पायाला गोळी लागल्याने गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने हॉस्पिटल मध्ये उपचारार्थ दाखक केले.

आणखी वाचा-पत्नीच्या नावे टपाल योजनांची वसुली, खातेदार रस्त्यावर

या घटनेची माहिती मिळताच बल्लारपूर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. या परिसरातील सी.सी. टिव्ही कॅमेरे तपासून चौकशी केली जात आहे. दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मालू यांच्या शेजारी तंबाखू व क्रिकेट ऑनलाईन सट्टा व्यवसाय करणाऱ्या संजय गुप्ता यांचे घर आहे. मालू व गुप्ता यांच्यात भांडण आहे. याच भांडणातून गुप्ता यांनी एक वर्षापूर्वी मालू यांचे दुकान जाळले होते. तेव्हापासून गुप्ता फरार आहे. त्याला न्यायालयातून अटकपूर्व जमीन देखील नाकारण्यात आला आहे. मागील काही दिवसांपासून मालू यांना जीवे मारण्याच्या धमक्या येत होत्या. मालू यांच्या घरी विवाह समारंभ असल्याने कार्यक्रम सुरू आहेत. मात्र गेल्या काही दिवसात धमक्या वाढल्या असल्याने मालू यांनी चार दिवसांपूर्वी पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांची भेट घेऊन हा घटनाक्रम सांगितला व तशी तक्रार देखील केली आहे. दरम्यान तक्रारीनंतर चार दिवसांनी गोळीबार झाल्याने मालू कुटुंबीय भयभीत झाले आहे. बल्लारपूर पोलिस आरोपीचा शोध घेत आहे.

तिकडे चंद्रपूर शहरातील रघुवंशी संकुलातील गोळीबार प्रकरणात एकूण तीन आरोपींचा सहभाग उघडकीस आला आहे. यामध्ये नागपूर जिल्ह्यातील उमरेड येथून दोन संशयीतांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर उत्तरप्रदेशातील एक जण फरार झाला आहे. या गोळीबारामागे नागपूर कारागृहात अंधेवार व अन्य तिघांमध्ये झालेल्या भांडणाची पार्श्वभूमी असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी जिल्ह्यातील गुन्हेगारांची झाडाझडती सुरू केली असून मागील पाच वर्षात शस्त्र संबंधिच्या गुन्ह्यातील ४० जणांची चौकशी केली आहे.

आणखी वाचा-नागपूर : दीक्षाभूमीवरील वाहनतळासाठीचे खड्डे बुजवणार, नासुप्रच्या बैठकीत निर्णय

जिल्हा पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन् यांनी मनसे नेत्यावरील गोळीबार प्रकरण अतिशय गांभीर्याने घेतले आहे. या घटनेच्या तपासासाठी एकूण सहा पथक गठीत केले आहे. गेल्या दोन दिवसात बल्लारपूर, चंद्रपूर, घुग्घुस तथा दुर्गापूर येथील मागील पाच वर्षात शस्त्रसंबंधिच्या गुन्ह्यात सहभागी असलेल्या ४० जणांची पोलिसांनी झाडाझडती घेतली आहे. या सर्व ४० जणांची वन टू वन चौकशी करण्यात आली. तर नागपुरात गेलेल्या पोलिसांच्या एका पथकाने गोळीबार प्रकरणी उमरेड येथून दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे तर एक जण उत्तरप्रदेशात फरार झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पोलिसांनी या दोन संशयीतांची नावे अद्याप जाहिर केली नसली तरी या गोळीबाराशी दोघांचाही थेट संबंध असल्याचे सांगण्यात येत आहे. यातील एक जण कोरपना येथील रहिवासी आहे तर दुसरा मोरवा येथील रहिवासी आहे. दरम्यान मनसे कामगार सेना जिल्हाध्यक्ष नागपूर कारागृहात शिक्षा भोगत असतांना ताब्यात घेतलेल्या दोघांशी भांडण झाले होते. या भांडणातून हा वाद विकोपाला गेला व एकमेकांना धमकी देण्यापर्यंत आला. याच दरम्यान अंधेवार व अन्य दोघांची कारागृहातून जामिनावर सुटका झाली. त्यानंतरही अंधेवार यांना या दोघांनी धमकी दिली. केवळ धमकीच दिली नाही तर अंधेवार यांच्यावर गोळीबार केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या या दोघांची कसून चौकशी केली जात आहे.

आणखी वाचा-रणथंबोरच्या “रिद्धी” वाघीण आणि बछड्यांची कमाल पहिलीत का !

दरम्यान मागील दोन दिवसांपासून शहर पोलिस रघुवंशी कॉम्पलेक्सवर लक्ष ठेवून आहे. याच संकुलात अंधेवार यांचे जनसंपर्क कार्यालय असल्याने तिथे येणाऱ्या प्रत्येकांच्या हालचाली टिपत आहेत. तसेच परिसरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यात आले आहे. गोळीबार प्रकरणात जखमी अंधेवार याच्या पाठितून शस्त्रक्रिया करून गोळी काढण्यात आली आहे. त्याची प्रकृती ठिक असून नागपूर येथेच उपचार सुरू आहेत.

दरम्यान या गुन्ह्यात सहभाग असल्याचा संशय असलेला बच्ची टोळीचा प्रमुख बच्ची यादव उर्फ विनय आरक हा गोळीबारीच्या घटनेपासून फरार आहे. पोलिस पथक बच्ची याचा देखील शोध घेत आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Petrol bomb blast and firing in ballarpur rsj 74 mrj
Show comments