नागपूर : शासनाने शुक्रवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पात मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील पेट्रोल व डिझेलवरील मूल्यवर्धित कर कमी करण्याची घोषणा केली. या घोषणेची अंमलबजावणी झाल्यास मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील पेट्रोलचे दर नागपूरपेक्षा कमी असतील.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वित्तमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी अर्थसंकल्प सादर करताना राज्यातील पेट्रोल व डिझेलवरील मूल्यवर्धित कर समान करण्याच्या तरतुदीचीही घोषणा केली. त्यानुसार मुंबई, नवी मुंबई, ठाणे येथील २४ टक्के असलेला पेट्रोलवरील मूल्यवर्धित कर कमी करून २१ टक्के, तर डिझेलवरील कर २६ टक्क्यांवरून २५ टक्के केला जाणार आहे. त्यामुळे या तिन्ही शहरांतील इंधनाचे दर कमी होतील.

हेही वाचा – अर्थसंकल्पावरील उद्धव ठाकरेंच्या टिकेवर बोलताना फडणवीस म्हणाले…

मुंबईत शुक्रवारी (२८ जून) पेट्रोलचे दर १०४.२० रुपये तर डिझेलचे दर ९२.१४ रुपये प्रतिलिटर होते. कर कमी झाल्यावर पेट्रोलचे दर १०३.५५ तर डिझेलचे दर ९०.०७ रुपयांपर्यंत खाली येतील. नवी मुंबईत शुक्रवारी पेट्रोलचे दर १०४.३६ तर डिझेलचे दर ९२.३० रुपये होते. हे दर कर कमी झाल्यावर पेट्रोल १०३.७१ तर डिझेल ९१.६५ रुपयांपर्यंत खाली येईल. ठाण्यात शुक्रवारी पेट्रोलचे दर १०४.३० रुपये तर डिझेलचे दर ९२.२४ रुपये होते. हे दर कर कमी झाल्यावर पेट्रोलचे दर १०३.६५ रुपये तर डिझेलचे दर ९१.५९ रुपयांपर्यंत खाली येतील. परंतु, नागपुरात सध्या पेट्रोलचे दर १०३.९४ रुपये तर डिझेलचे दर ९०.५३ रुपये प्रतिलिटर आहेत. नागपुरात पेट्रोल व डिझेलवरील मूल्यवर्धित कर आधीच कमी करण्यात आला होता. मात्र नागपुरात वाहतुकीचा खर्च जास्त असल्याने मुंबई, ठाण्याहून पेट्रोल डिझेलचे दर अधिक आहेत. नवीन घोषणेमुळे दरांमधील तफावत आणखी वाढणार आहे.

वाहतूक शुल्कामुळे इंधनाचे दर अधिक

इंधनाच्या दराव्यतिरिक्त वाहतुकीच्या खर्चानुसार विविध शहरांतील पेट्रोल, डिझेलचे दर हे कमी-अधिक असतात. त्यानुसार मुंबई, ठाण्याच्या तुलनेत नागपुरात वाहतूक खर्च अधिक असल्याने येथे इंधनाचे दर अधिक असल्याचे या क्षेत्राचे जाणकार सांगतात. त्याला विदर्भ पेट्रोल डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अमित गुप्ता यांनीही दुजोरा दिला.

हेही वाचा – नागपूर : कुलगुरू डॉ. चौधरींवर सोमवारी कारवाई? राज्यपालांना मागितली दोन दिवसांची…

पेट्रोल, डिझेलचे दर कसे ठरतात?

केंद्र आणि राज्य सरकार पेट्रोल आणि डिझेलवर प्रचंड कर आकारते. देशातील प्रमुख तेल कंपन्या हिंदुस्थान पेट्रोलियम, इंडियन ऑईल आणि भारत पेट्रोलियम दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर ठरवतात. पेट्रोल आणि डिझेल हे केंद्र आणि राज्य सरकारच्या उत्पन्नाचे प्रमुख स्रोत आहेत. कच्च्या तेलाची आधारभूत किंमत, उत्पादन शुल्क, डीलरचे कमिशन आणि शुल्क आणि मूल्यवर्धित कर यासारख्या अनेक निर्देशकांच्या आधारे इंधनाच्या किमती मोजल्या जातात. ‘पीपीएसी’च्या तात्पुरत्या आकडेवारीनुसार २०२३-२४ मध्ये, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि तमिळनाडू यांनी अनुक्रमे ३६ हजार ३५९ कोटी, ३० हजार ४११ कोटी आणि २४ हजार ४७० कोटी संकलनासह पेट्रोलियममधून कर महसूल कमावला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Petrol diesel more expensive in nagpur than mumbai thane what maharashtra budget impact on petrol diesel prices find out mnb 82 ssb