नागपूर : भिवापूर ते नागभीड रोडवर असलेल्या पाटील पेट्रोल पंपवर तिघांनी पंपचालकाचा चाकूने हल्ला करून खून करीत लुटमार केली. ही घटना बुधवारी सकाळी दहा वाजता घडली.
दिलीप राजेश्वर सोनटक्के (रा. दिघोरी) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या हत्याकांडात ग्रामीण पोलिसांनी चार तासांत तीन आरोपींना अटक केली.
हेही वाचा – वर्धा : ‘समान काम समान वेतन अन्यथा राज्यव्यापी कामबंद आंदोलन’; नर्सेस संघटनेचा इशारा
भिवापूर ते नागभीड रोडवर दिलीप सोनटक्के यांचे पाटील पेट्रोल पंप आहे. बुधवारी सकाळी १० वाजता दिलीप हे कार्यालयात इंधनविक्रीचे पैसे मोजत होते. दरम्यान, दुचाकीवरून तीन युवक आले. त्यांनी दिलीप यांना पिस्तूल दाखवली आणि १ लाख ३४ हजार रुपये हिसकले. दिलीप यांनी प्रतिकार केला असता आरोपींनी त्यांच्यावर चाकूने हल्ला केला.
कर्मचाऱ्यांनी मदतीसाठी धाव घेतली असता त्यांनाही ठार मारण्याची धमकी दिली. तीनही आरोपींनी दुचाकीने उमरेडच्या दिशेने पळ काढला. या प्रकरणाची पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी गांभीर्याने दखल घेऊन जिल्ह्यात नाकाबंदी केली. उपविभागीय अधिकारी संजय पुरंदरे यांच्या नेतृत्वात निरीक्षक प्रमोद घोंगे यांनी तीनही आरोपींना चार तासांत अटक केली. शेख अफरोज (ताजबाग), मोहम्मद वसीम सोनू (२७, खरबी) आणि शेख जुबेर (मोठा ताजबाग) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
हेही वाचा – नागपूर : काही वादग्रस्त वाहतूक पोलिसांच्या बदल्या
आरोपींकडून १ लाख ३४ हजार रुपये, पिस्तूल, काडतूस जप्त करण्यात आले. तिघांनीही खुनाची कबुली दिली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.