नागपूर : राजकीय क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वातून यशाचे अनेक टप्पे गाठणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यकर्तृत्वावर नाशिकमधील प्रा. मारोती जनार्दन कंधारे पीएचडी करत असून लवकरच ते शोधप्रबंध विद्यापीठाला सादर करणार आहेत.
मूळचे नांदेड मात्र सध्या नोकरीच्या निमित्ताने नाशिक जिल्ह्यात लासलगाव येथे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात कार्यरत प्राध्यापक प्रा. मारोती जनार्दन कंधारे हे नितीन गडकरी यांच्या कार्याने प्रभावित झाले आणि त्यांच्यावर पीएचडी करण्याचा त्यांनी निर्णय घेत २०२० पासून संशोधन सुरू केले. मी भाजपाचा सदस्य नाही, मात्र गडकरी यांची कार्यशैली आणि त्यांच्या विचाराने प्रभावित होऊन त्यांच्यावर पीएचडी करण्याचा निर्णय घेतल्याचे प्रा. कंधारे यांनी सांगितले.
‘नितीन गडकरी यांच्या सामाजिक व राजकीय कार्याचा चिकित्सक अभ्यास’ असा त्यांचा संशोधनाचा विषय आहे. सहा विद्यापीठाचे ‘डीलीट’ मिळवणारे गडकरी यांचे सामाजिक व कौटुंबिक जीवन, राजकीय जीवनाला सुरुवात, विधानपरिषदेमध्ये बजावलेली भूमिका, सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून केलेले कार्य, केंद्रात मंत्री म्हणून करत असलेले कार्य, या सर्व कार्यांचा आढावा त्यांनी संशोधनात घेतला आहे.