लोकसत्ता टीम
नागपूर : गेल्या अनेक वर्षापासून राजकीय क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वातून यशाचे अनेक टप्पे गाठणारे आणि विकास पुरुष म्हणून ज्यांची समाजात ओळख निर्माण करणारे भाजप नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सामाजिक व राजकीय क्षेत्रातील कार्यावर प्रा. मारोती जनार्दन कंधारे यांनी शोध प्रबंध जळगाव विद्यापीठाला सादर केला. विद्यापीठाने त्यांना नुकतीच आचार्य ( पीएचडी)पदवी प्रदान केली आहे.
नितीन गडकरी यांनी केलेल्या विकास कामांचा अभ्यास करून त्यावर आधारित शोध प्रंबधाला मिळालेली ही पहिलीच पीएचडी आहे. विशेष म्हणजे गडकरी यापूर्वी गडकरी यांच्यावर चित्रपट निर्मिती करण्यात आली होती.
आणखी वाचा-नागपुरात पदभरती परीक्षेदरम्यान महिलांचा गोंधळ… कारण काय?
वेगवेगळ्या विषयावर शोधप्रबंध सादर करुन आचार्य पदवी मिळणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे मात्र एखाद्या राजकीय व्यक्तींच्या कार्यकतृर्त्वावर शोधप्रबध लिहणाऱ्यांची संख्या मोजकीच आहे. मुळचे नांदेडमध्ये राहणारे मात्र सध्या नोकरीच्या निमित्ताने नाशिक जिल्ह्यात लासलगाव येथे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात कार्यरत प्रा. मारोती जनार्दन कंधारे यांनी गडकरी यांच्या विकास कामांचा विषय शोध प्रबंधासाठी निवडला. ते विद्यार्थी जीवनापासून नितीन गडकरी यांच्या कार्याने प्रभावित झाले आणि त्यांच्यावर पीएचडी करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव अंतर्गत राज्यशास्त्र विषयात नितीन गडकरी यांचे सामाजिक व राजकीय कार्याचे चिकित्सक अध्ययन या विषयावर शोध प्रबंध सादर केला. त्यावर त्यांना आचार्य पदवी मिळाली आहे.
सहा विद्यापीठांनी ‘डीलीट’ प्रदान करून नितीन गडकरी यांना सन्मानित केले आहे. त्यांची कौटुंबिक व सामाजिक पार्श्वभूमी, त्यांच्या नेतृत्वाची जडणघडण, राजकीय कारकीर्दी विधिमंडळातील प्रवेश, सार्वजानिक बांधकाम मंत्री , विधानपरिषद विरोधी पक्षनेते, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय मंत्री या सर्व राजकीय प्रवासांची वाटचालीचा समावेश या शोध प्रबंधात करण्यात आला आहे. या शिवाय गडकरी यांचे सामाजिक क्षेत्रातील कामामध्ये समाजातील दुलक्षित, वंचित गरबी घटकांसाठी आरोग्य विषयक जलसंवर्धन विषयक काम, कृषी विषयक, रोजगार विषयक, शिक्षण, मनुष्यबळ विकास विषयी केलेल्या एकूण कार्याचा आढावा यात घेण्यात आला आहे. गडकरी यांची राज्य विधिमंडळातील आणि महाराष्ट्रातील सार्वजानिक बांधकाम मंत्री म्हणून केलेले कार्य व भूमिका, केंद्रीय कायदेमंडळातील आणि केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग, बंदरे, जहाज वाहतूक, जलमार्ग मार्ग म्हणून केलेले कार्य व त्याबाबतची भूमिका याचा आढावा या संशोधनात करण्यात आला आहे.
आणखी वाचा-असे असावे टुमदार घरकुल, उन्हाळ्यात थंड आणि हिवाळ्यात…
एकूणच गडकरी यांनी केलेले कार्य, पक्षातील भूमिका, त्यांचे गुणवैशिष्ठ्ये, काम करण्याची पद्धत, त्यांचा स्वभाव, निवडणुका, पक्ष, विविध पक्षातील नेत्यांशी त्यांचे असलेले संबंध, पक्षातील भूमिका या सर्व घटनांचा शोध निंबधामध्ये समावेश करण्यात आला आहे.
प्रा. श्रीराम कंधारे म्हणाले , २०१९ पासून गडकरी यांच्या कार्याने प्रेरीत होऊन संशोधन सुरू केले. मी भाजपाचा सदस्य नाही, मात्र गडकरी यांची कार्यशैली आणि त्यांच्या विचाराने प्रभावित होऊन त्यांच्यावर पीएचडी करण्याचा निर्णय घेतला आणि पाच वर्ष त्यावर अध्ययन करुन शोधनिबंध लिहित तो विद्यापीठात सादर केला .