नागपूर : उन्हाळ्याची चाहूल यंदा वेळेपेक्षा बराच आधी लागली. एरवी होळीच्या सुमारास सुरू होणारा उन्हाळा यंदा फेब्रुवारीच्या पुर्वार्धातच सुरू झाला. उन्हाचे चटके आणि उकाडा अशा दोन्ही गाेष्टी एकत्रीतच जाणवू लागल्याने नागरिकही हैराण झाले आहेत. जंगलातल्या प्राण्यांची स्थितीही याहून वेगळी नाही. उन्हाच्या चटक्यांपासून आणि उकाड्यापासून सुटका करुन घेण्यासाठी माणसांपुढे एसी आणि कुलरचे पर्याय आहेत. मात्र, वन्यप्राण्यांचे काय? या गोष्टीचा त्रास त्यांनाही होत आहे आणि त्यांच्यासाठी जंगलातील पाणवठे हाच एक पर्याय आहे.

ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील वाघीण ‘छोटी तारा’ आणि तिच्या बछड्यांनी तरी हाच मार्ग स्वीकारला आहे. वन्यजीव छायाचित्रकार इंद्रजीत मडावी यांनी त्यांच्या शाही स्नानाचा व्हिडिओ चित्रित केला आहे.

ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात अलीकडेच ‘छोटी तारा’ आणि तिच्या बछड्यांनी उन्ह आणि उकाड्यापासून सुटका करुन घेण्यासाठी व्याघ्रप्रकल्पातील नैसर्गिक पाणवठ्याची निवड केली. बराचवेळ हे कुटूंब शाही स्नानाचा आनंद लुटत होते. अंगाचा दाह शमल्यानंतर मग कुठे ते पाणवठ्याबाहेर आले. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील ‘छोटी तारा’ ही वाघीण म्हणजे या जंगलाची तारका. तिचे बछडेही तिच्यासारखेच. पर्यटकांना सहज दर्शन द्यायची जी सवय ‘छोटी तारा’ला होती, तीच तिच्या बछड्यांना देखील.

‘छोटी तारा’ ही वाघीण त्यातलीच एक. ताडोबाच्या जंगलात पहिल्यांदा जर कोणत्या वाघिणीला रेडिओ कॉलर लावण्यात आले असेल तर ती ‘छोटी तारा’ला. २०१४च्या सुमारास तिला रेडिओ कॉलर करण्यात आले. २०२० मध्ये नंतर ही कॉलर काढण्यात आली. ताडोबातील मोहर्लीचे वनक्षेत्र हा तिचा मुळ अधिवास. खरं तर ती आता उतारवयाकडे झुकली आहे, पण तिला पाहिल्यानंतर ते दिसून येत नाही. तिचा बिनधास्तपणा आजही तसाच कायम आहे. तोच गुण तिच्या बछड्यांमध्ये देखील दिसून येतो. ‘छोटी तारा’ असोत वा तिचे बछडे, ते अगदी सहजपणे पर्यटकांना सामोरे जातात. कदाचित त्यामुळेच ते अधिक प्रसिद्ध असावेत. अलीकडे तर तिचे बछडे देखील तिचीच ‘री’ ओढायला लागले आहेत. आतापर्यंत ‘छोटी तारा’ने सहावेळा बछड्यांना जन्म दिला आहे. आता सध्या तिच्यासोबत दिसून येणारे आणि प्रचंड मस्तीखोर दिसणारे तिचे बछडे म्हणजे तिच्या पोटी जन्माला येणारे शेवटचेच. छोटी ताराचे तिच्या या बछड्यांसोबतच्या अनेक ध्वनीचित्रफिती आणि छायाचित्र अलिकडे समाजमाध्यमावर येत आहेत.

Story img Loader