नागपूर : छायाचित्रकार विनय पुणेकर याच्यावर गोळ्या झाडण्यात आलेल्या पिस्तूलचा अखेर सदर पोलिसांनी छडा लावला. देवसर (हरियाणा) या गावातील शेताच्या झोपडीत गाडून ठेवलेले पिस्तूल आरोपी हंसराज चव्हाण (२१) याच्याकडून माहिती घेऊन हस्तगत केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

छायाचित्रकार विनय पुणेकरवर आरोपी हेमंत शुक्लाने २३ फेब्रुवारीला घरात शिरून गोळ्या झाडल्या. प्रेयसी साक्षी ग्रोवरशी अनैतिक संबंध असल्यामुळे हेमंतने विनयचा गोळ्या झाडून खून केला. घटनेच्या वेळी तो साक्षीचा दीर बनून विनयच्या घरात शिरला होता, अशी माहिती पोलीस तपासात समोर आली.

हेही वाचा : नागपूर: पावसामुळे मुंबईचे विमान रद्द, विदर्भ एक्सप्रेसला १२ तास विलंब

पोलिसांनी आधी साक्षीला अटक केली. नंतर हेमंतसह त्याचे साथीदार धर्मेंद्र शर्मा तसेच धर्मेंद्रचा पुतण्या अभिषेक शर्मा (२२) व हंसराज चव्हाण (२१) या तिघांच्याही मुसक्या आवळल्या. न्यायालयाने हेमंतसह तिघांनाही ८ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. हेमंतने घटनेत वापरलेले पिस्तूल पोलिसांना शोधायची होते. परंतु हेमंत पोलिसांची दिशाभूल करीत होता. घटनेनंतर रायपूरच्या खारून नदीत फेकल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. त्याने दिलेल्या माहितीवरून पोलीस पथकाने स्थानिक युवकांच्या मदतीने खारून नदीतही शोध घेतला. एवढेच काय तर पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे यांनी बक्षीसही जाहीर केले. मात्र, पिस्तूल मिळाले नाही.

दरम्यान, पोलिसांनी आरोपींना पोलिसी खाक्या दाखवताच हेमंत पोपटासारखा बोलला. हरियाणा सोडण्यापूर्वी हंसराजकडे पिस्तूल दिल्याचे सांगितले. पोलिसांनी हंसराजची चौकशी केली. हंसराजने गावातील शेताचा नकाशा पोलिसांना तयार करून दिला. त्याप्रमाणे पोलिसांचे एक पथक देवसर या गावात पोहोचले. शेतातील झोपडीत त्याने पिस्तूल गाडून ठेवले होते. पोलिसांनी पिस्तूलचा शोध घेतला आणि नागपुरात आणले. न्यायालयाच्या आदेशाने आता सर्व आरोपींची कारागृहात रवानगी करण्यात आली. ही कारवाई पोलीस उपायुक्त राहुल मदने यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार मनीष ठाकरे यांच्या नेतृत्वातील पथकाने केली.

हेही वाचा : Video: बछड्यांसह वाघीण निघाली ऐटीत….पण, भररस्त्यात असे काही घडले की चवताळून थेट पर्यटकांवर…

कुस्तीपटू होण्यासाठी हंसराज रायपुरात

हंसराजला आई, वडील आणि एक मोठा भाऊ आहे. वडील शेती करतात. त्यांची शेती देवसर या गावात आहेत. हंसराजला कुस्तीपटू बनायचे होते. त्यासाठी तो रायपूर येथे गेला होता. रायपूरला कुस्ती प्रशिक्षण केंद्र आहे. येथे तो कुस्तीचे प्रशिक्षण घेत होता. दरम्यान, तो नियमित जीमला जायचा. यादरम्यान जीममध्येच त्याची ओळख धर्मेंद्र याच्याशी झाली. याच माध्यमातून अभिषेक आणि हेमंतशी परिचय झाला. त्यातूनच तो गुन्हेगारी विश्वात आला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Photographer vinay punekar murder case pistol buried in haryana s farm slum adk 83 css
Show comments