अमरावती : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथील एका कार्यक्रमात बोलताना छायाचित्रकारांविषयी केलेल्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करीत येथील छायाचित्रकारांनी मंगळवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्र येऊन निषेध नोंदविला. या वक्तव्याबद्दल उपमुख्यमंत्र्यांनी माफी मागावी, अशीही मागणी छायाचित्रकारांनी केली आहे. आमदार अमित साटम यांच्या उडान या पुस्तकाचे २९ जून रोजी राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते प्रकाशन झाले. या प्रकाशन सोहळ्यात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता त्यांच्यावर मिश्किल टिप्पणी केली होती.
हेही वाचा >>> वर्धा : तळ्यात मळ्यात ! विधानसभेसाठी दोन तगड्या उमेदवारांची राजकीय पक्ष की अपक्ष अशी दुविधा
“कधी काय होते की कोणाला फोटोग्राफी आवडते आणि ते मुख्यमंत्री बनले तर समस्या निर्माण होते. मी कोणाचे नाव घेत नाहीय, हा राजकीय कार्यक्रम नाही. पण, मी एक उदाहारण देतोय”, असे फडणवीस म्हणाले होते. देवेंद्रजी फडणवीस हे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि एक जबाबदार व्यक्तिमत्व आहे. असे असताना त्यांनी छायाचित्रकार मुख्यमंत्री झाला तर अडचण निर्माण होते, असे बेताल विधान करुन त्यांनी देशातील सर्व छायाचित्रकारांचा अपमान केला आहे. मुळात फोटोग्राफी हा छंद आणि व्यवसाय दोन्ही आहे. हा छंद जोपासणारी व्यक्ती कुठल्याही सर्वोच्च पदी बसू शकते, आणि बसलेली आहे. परंतू देवेंद्रजी फडणवीस यांना आपल्या वक्तव्यातून फोटोग्राफी करणारा माणूस हा कुठल्याच कामाचा नसतो, असे त्यांना भासवायचे आहे. असे बेताल विधान करणे त्यांच्या सारख्या जेष्ठ व जबाबदार नेत्यांना शोभत नाही.
हेही वाचा >>> खापरखेडा वीज केंद्राची राख कन्हान नदीत.. दूषित पाण्यामुळे नागपूरकरांचे आरोग्य धोक्यात..
आम्ही काही कोणत्याच राजकीय पक्षाशी बांधील नाही. आम्ही हा व्यवसाय करून आपल्या परिवाराच्या गरजा पूर्ण करीत असतो. कोणत्याही पक्षाचे नेते आम्हाला सांभाळत नाही. आम्ही आमच्या परीने कष्ट करून आमचे कुटुंब सांभाळत असतो. फोटोग्राफी ही कला आहे आणि कलाकार त्याच्या योग्यतेनुसार जर उच्च पदावर कार्यरत झाला तर आपणास त्याचा राग येऊ नये. मुळात आज पर्यंत आपल्या राज्यात फोटोग्राफी व्यवसाय करणारी व्यक्ती राज्याच्या सर्वोच्च पदावर बसलेली नाही. तरी असे विधान करणे आपल्या सारख्या जेष्ठ व सुसंस्कृत नेत्यांना शोभत नाही. फोटोग्राफी ही कला आहे. आणि कलाकार नेत्याला आपले नाव लहानाचे मोठे होण्यासाठी प्रसिध्दीची गरज असते. ज्यामध्ये छायाचित्रकारांचा मोठा वाटा असतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुध्दा फोटोग्राफी करतात. तशी छायाचित्रे समाजमाध्यमांवर प्रसारीत सुध्दा झाली आहेत. आपले राजकीय मतभेद व्यक्त करत असताना छायाचित्रकारांना त्यामध्ये ओढू नये. आपण जे विधान केले आहे त्या बाबत खुलासा करावा व महाराष्ट्रातील सर्व छायाचित्रकारांची जाहीर माफी मागा, असे फोटोग्राफर-व्हीडीओग्राफर कृती समितीने निवेदनात म्हटले आहे.