नागपूर : एका २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार करून तिची अश्लिल चित्रफित आणि छायाचित्रे व्हॉट्सअॅप ग्रुपवर व्हायरल केल्याप्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी एका आरोपीवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. विकास उर्फ कुंदनसिंग (२७) श्रीरामपूर, पाटणा (बिहार) असे आरोपीचे नाव आहे.
विकास हा मौदा येथील एनटीपीएस कंपनीत मशीन ऑपरेटर म्हणून कार्यरत आहे. तरुणी ही मुळची गोंदिया जिल्ह्यातील असून नागपुरात ती एका खाजगी रुग्णालयात परिचारिका म्हणून कार्यरत आहे. अधूनमधून ती आपल्या गावी जात असे. ३१ डिसेंबर २०२१ रोजी गावावरून बसने नागपूरला येत होती. त्यावेळी विकास हा मौदा येथून बसमध्ये तिच्याजवळ असलेल्या सिटवर बसला. प्रवासादरम्यान त्यांची बोलचाल सुरू झाली. त्यावर विकासने तिला ‘मला नागपूरची फारशी माहिती नाही मला मदत करशील काय?’ अशी विचारणा केली. त्यावर तरुणीने होकार दिला. दरम्यान, त्यांच्यात प्रेमसंबंध जुळले. दोघांची भेट ठरली.
हेही वाचा : तोतया जवानाकडून विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण
विकास हा तरुणीच्या खोलीवर आला आणि तिच्यावर बलात्कार करून तिची अश्लिल चित्रफित आणि छायाचित्रे काढली. ती छायाचित्रे त्याने तरुणीला पाठविली. त्यानंतर तो वारंवार ही छायाचित्रे समाजमाध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार करीत होता. तिने याला नकार दिल्यावर त्याने त्याच्या मित्राच्या व्हॉट्सअप ग्रुपवर तिची अश्लिल छायाचित्रे व्हायरल केली. त्यामुळे तरुणी चिडली आणि तिने सीताबर्डी पोलीस ठाण्यात तक्रार केली. या तक्रारीवरून पोलिसांनी विकासवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. सध्या तो फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.