चंद्रपूर: शासकीय रुग्णालयात अस्वच्छतेने कळस गाठलेला आहे. रुग्णालयात जागोजागी कचऱ्याचे ढीग पहायला मिळत आहे. आजारावर उपचार घेण्यासाठी येथे आलेल्या रुग्णांचा आणि त्यांच्या कुटुंबीयांचा जीव येथील अस्वच्छतेने धोक्यात आल्याचे चित्र आहे. कंत्राटदारामार्फत भरावयाची १९० स्वच्छता कामगारांची पदे मागील अडीच वर्षांपासून रिक्त असल्यामुळे येथील स्वच्छतेच्या कामांना खीळ बसली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

स्वच्छता कामगार कार्यरत नसल्यामुळे रुग्णालयील वॉर्ड आणि परिसरात कचऱ्याचे ढिगारे साचले आहेत. यातून निघणाऱ्या दुर्गंधीमुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. येथील शौचालयांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. अस्वच्छतेमुळे या शौचालयात जाण्यास कुणीही धजावत नाही. येथील स्वच्छतागृहे अस्वच्छतेच्या गर्तेत सापडले आहे.

हेही वाचा… आता भाजपा आमदाराची संघटनाच करणार आंदोलन, एसटी कर्मचाऱ्यांच्या ‘या’ आहेत मागण्या

उपचारासाठी वापरण्यात आलेल्या साहित्यांनी भरलेल्या प्लास्टिक पिशव्या वॉर्डाबाहेर तशाच ठेवल्या जातात. त्या तत्काळ तेथून उचलण्याची तसदी घेतली जात नाही. रुग्णालयाच्या वॉर्डातील भिंती ‘थुंकीबहाद्दरांनी’ रंगवून ठेवल्या आहेत. या ‘थुंकीबहाद्दरांना’ रोखण्यासाठी रुग्णालयात कोणीही कार्यरत नाही. नियमित स्वच्छतेअभावी थुंकीद्वारे झालेली रंगरंगोटी किळसवाणी ठरते आहे. रुग्णालयाच्या दोन वॉर्डांतील मोकळ्या जागेत पावसाचे पाणी साचले आहे. याद्वारे रुग्णालय प्रशासनच ‘डेंग्यू’सारख्या आजारांना निमंत्रण देत आहे की काय, असा प्रश्न उपस्थित होतो.

स्वच्छता कामगार, कक्षसेवक, सुरक्षा रक्षक, ऑपरेटर, वाहनचालक, स्वच्छता निरीक्षक, स्वयंपाकी, लिपीक, आदी पदांवर दरवर्षी ११ महिन्यांकरिता कंत्राटी कामगारांची नियुक्ती केली जाते. राज्य शासनाची मंजुरी मिळाल्यानंतर मे २०२० मध्ये चंद्रपूरच्या वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने अशी ५६२ कंत्राटी पदे भरण्याकरिता राबविलेल्या निविदा प्रक्रियेत १९० सफाई कामगार व ४५ सुरक्षा रक्षकांचा समावेश होता. मात्र, १९० स्वच्छता कामगारांची नियुक्ती करण्याचे टाळण्यात आले. त्यामुळे आतापर्यंत ही पदे रिक्त आहेत.

स्वच्छता कामगारांची पदे रिक्त असल्यामुळे रुग्णालयातील स्वच्छतेला खीळ बसली आहे. अस्वच्छता आणि दुर्गंधीमुळे मेटाकुटीस आलेल्या रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांसह नागरिकांमधून याविरोधात रोष व्यक्त केला जात आहे. सरकार आणि रुग्णालय प्रशासनाने याची वेळीच दखल घेऊन स्वच्छता कामगारांची पदे तत्काळ भरावी आणि रुग्णालयात नियमित स्वच्छता होईल, याची काळजी घ्यावी, अशी मागणी केली जात आहे.

वैद्यकीय शिक्षण विभाग, अधिष्ठाता व जिल्हाधिकाऱ्यांना उच्च न्यायालयाची नोटीस

जनविकास असंघटित कामगार कर्मचारी संघाचे संस्थापक व अध्यक्ष माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये जुलै २०२१ मध्ये एक रीट याचिका दाखल केली होती. या याचिकेची दखल घेत न्यायालयाने राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव, संचालक तसेच चंद्रपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता व चंद्रपूरचे जिल्हाधिकारी यांना नोटीस पाठवून चार आठवड्यात उत्तर मागितले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Piles of garbage can be seen everywhere in the government hospital in chandrapur rsj 74 dvr