वर्धा : तीर्थयात्रेस किंवा सहलीवर निघावे अन वेळेवर प्रवास रद्द झाल्याचे समजले, तर हिरमुसले होणारच. अन्यची चूक असल्यास तर मग आगपाखड किंवा प्रसंगी ज्येष्ठ मंडळी लाखोली वाहनार. आज असाच तळतळाट व्यक्त होत असल्याचे दिसून आले. शासनाच्या मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेत पात्र ठरलेल्या ज्येष्ठ नागरिकांना झटका बसला. १३ ते १७ मार्च या दरम्यान त्यांचा अयोध्या दर्शन शासन पुरुस्कृत दौरा ठरला होता. मात्र हे तीर्थाटण वेळेवर रद्द झाले. मंगळवारी व आज दौरा रद्द झाल्याचे निरोप या पात्र लाभार्थ्यांना दिल्या जात आहे. कारण होळीचे दिल्या जाते. पण होळी काही वेळेवर आली नसून ठरल्या तिथीवरच आली. शासनास हे माहित होते. मग खरे कारण सांगा, असे संबंधित समाजकल्याण खात्यास विचारून भंडावून सोडल्या जात असल्याचे दिसून आले.
तिजोरीतील खणखनाट हेच यामागचे कारण असल्याची चर्चा सूरू झाली आहे. आजच्या लोकसत्ताच्या ‘ समृद्धीचे स्मारक ‘ या अग्रलेखतून लाडकी बहिण योजना, त्यासाठी केलेली ३६ हजार कोटी रुपयाची तरतूद व परिणामी अन्य त्यामुळे प्रभावित होणारे अन्य कार्यक्रम याचे विश्लेषण आहे. त्याचा हा ताजा दाखला म्हणता येईल. वरीष्ठाकडून प्रवास रद्द करण्याची सूचना द्या, असे निर्देश आल्याचे एका अधिकाऱ्याने नमूद केले. योजनेवरील खर्च टाळण्याचा हा प्रकार असू शकतो, अशी शंका व्यक्त करण्यात आली. आनंदाच शिधा, शिवभोजन या दोन नंतर खर्चास कात्री लागलेली ही योजना म्हणता येईल. कारण मोठी तरतूद प्रस्तावित आहे. एकट्या वर्धा जिल्ह्यातून ८०० ज्येष्ठ नागरिक या तीर्थ यात्रेसाठी पात्र ठरविण्यात आले.प्रत्येकी ३० हजार रुपयाची तरतूद. त्यात प्रवास, भोजन, निवास व अन्य किरकोळ खर्च प्रती प्रवासी ठरला.
वेळेवर निरोप आल्याने काही ज्येष्ठ संतप्त, काहींची आगपाखड तर काहींनी शिव्याशाप देणे सूरू केल्याचे चित्र आहे. रद्द झाल्याचा निरोप लाभार्थ्यांना देणारे असा अनुभव घेत आहे. उद्या गुरुवारी निघायचे म्हणून या सर्वांनी जय्यत तयारी केली होती. शासनाने त्यांची वैद्यकीय तपासणी पूर्वीच आटोपली. सर्व ज्येष्ठ बॅगा भरून तयार. वडिलधारा व्यक्ती तीर्थयात्रेस जाणार म्हणून लेकी सुनांनी दशम्या, नाश्त्याचे पदार्थ व अन्य तयारी करून दिली. गावातून वेळेवर रेल्वे स्टेशनवर जातांना गोंधळ उडू नये म्हणून अनेक आजच आपल्या आप्ताकडे मुक्कामी आले. मात्र हिरमुसले. काही कुटुंबात लाडकी बहिण योजनेची लाभार्थी व या तीर्थ प्रवास योजनेचा असे दोन्ही लाभार्थी आहेत. शासनाच्या नावे बोटं मोडणारे व टाळ्या वाजविणाऱ्या भगिनी, असेही दृष्य आहे.
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचा आदेश १४ जुलै २०२४ रोजी निघाला. आदेशात नमूद केल्यानुसार आयुष्यात एकदा तरी तीर्थ यात्रेस जाण्याचे ज्येष्ठ नागरिकांचे स्वप्न असते. परंतु गोरगरीब, सामान्य कुटुंबातील ज्येष्ठ नागरिक आर्थिक बिकट स्थिती, सोबत नसल्याने किंवा माहिती अभावी यात्रेस जाऊ शकत नाही. ही बाब विचारात घेऊन अश्या ज्येष्ठ नागरिकांना देशातील मोठ्या तीर्थस्थळी जाणे व आध्यात्मिक पटली गाठने सूकर व्हावे म्हणून ही योजना. सर्व धर्मातील ज्येष्ठ नागरिकांना राज्य व देशातील स्थलांना मोफत भेटीची संधी मिळावी, म्हणून ही योजना असल्याचे नमूद आहे. मात्र हा पहिलाच दर्शन दौरा फिस्कटला.