लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर : लेखा मेंढा गावाला देशपातळीवर ओळख निर्माण करुन देणारे आणि पर्यावरण व वनाधिकार क्षेत्रातील कार्यकर्ते मोहन हिराबाई हिरालाल यांचे मध्यरात्री १२ वाजून ५० मिनिटांनी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते.

जयप्रकाश नारायण यांच्या छात्र युवा संघर्ष वाहिनीचे ते सक्रीय सदस्य होते. गांधीजी-विनोबाजींच्या जनशक्तीच्या प्रबंधावर त्यांचा विश्वास होता. १९८४ मध्ये गडचिरोली जिल्ह्यात त्यांनी वृक्षमित्राची स्थापना केली. ते निःस्वार्थी सहयोगी मित्र (सहकारी मित्र), एक कार्यकर्ता आणि ग्रामस्वराज संकल्पनेचा प्रसार करणारे एक जाणकार कार्यकर्ता होते. वन संवर्धन, टिकाऊपणा, समानता आणि सुरक्षा या तीन प्रमुख पैलुंवर जोर देत त्यांनी भूमिका बजावली. श्री मोहन हिराबाई हिरालाल यांच्या ज्ञानाने आणि दिग्दर्शनामुळे मेंढा (लेखा) येथील लोकांना ग्रामसभा अधिक सर्वसमावेशक, सहभागी आणि सक्रिय करण्यात मदत झाली. त्यांनी गावकऱ्यांना महिलांचा सहभाग, दारूबंदी, वनसंरक्षण आणि हक्क, भ्रष्टाचाराविरुद्ध लढा, सांस्कृतिक हक्क, युवा सक्षमीकरण, शाश्वतता, समानता आणि सुरक्षा यावर लक्ष केंद्रित करण्यास मदत केली.

आणखी वाचा-असेही औदार्य! मित्रांनी भेट दिली कार, ती विकून घेतली रुग्णवाहिका…

मोहन हिराबाई हिरालाल यांनी गावकऱ्यांमध्ये जंगलावरील त्यांच्या कायदेशीर हक्कांबद्दल जागरुकता निर्माण केली. ज्यामुळे स्थानिक, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर सहभागी वनव्यवस्थापन लोकप्रिय करण्यात मदत झाली. यामुळे २००९ मध्ये सरकारने वन हक्क कायदा २००६ अंतर्गत मेंढा (लेखा) आणि मर्दा या गावांना सामुदायिक वन हक्क प्रदान केले. मेंढा (लेखा) चे क्रांतिकारी घोषवाक्य ‘दिल्ली आणि मुंबईत आमचे सरकार आहे, पण गावात आम्हीच सरकार आहोत’, हे गाव आणि तेथील लोकांच्या भावनेचे उदाहरण देते. २०१३ मध्ये, श्री मोहन हिराबाई हिरालाल आणि ग्रामस्थांच्या अथक प्रयत्नांनंतर, मेंढा (लेखा) च्या ग्रामदानाच्या सर्व कायदेशीर औपचारिकता पूर्ण झाल्या आणि गावाला महाराष्ट्र ग्रामदान अधिनियम १९६४ अंतर्गत ग्रामदान गाव म्हणून घोषित करण्यात आले.

हे देशातील पहिले गाव आहे. माझ्या कल्पनेतलं ‘ग्रामस्वराज’ हे एक संपूर्ण प्रजासत्ताक आहे, असे महात्मा गांधी म्हणाले होते. त्यानंतर त्यांचे शिष्य विनोबा भावेंनी गांधींजींचीच कल्पना पुढे नेत ‘सर्वायतन’ अशी संकल्पना मांडली होती आणि त्यातली एक गोष्ट अशी होती की, अशा खेड्याची कल्पना त्यांनी केली होती, जिथे प्रत्येक निर्णय हा सर्वसहमतीने केला जात असेल. या कल्पना प्रत्यक्षात येऊ शकतात का ? असे गाव खरंच असते का ? गांधींच्या आणि विनोबांच्या कल्पनांची पूर्ती महाराष्ट्राच्या गडचिरोलीतल्या दाट जंगलात झाली. इथल्या गोंड आदिवासी मेंढालेखा गावाने जे करुन दाखवले, ते या देशात अगोदर कोणालाही जमले नव्हते. या पाचशे लोकवस्तीच्या गावाने दीड कोटींचे वार्षिक उत्पन्न घेऊन दाखवले. आजपर्यंत प्रत्येक निर्णय बहुमताने नाही तर सर्वसहमतीने सातत्याने करुन दाखवला.

आणखी वाचा-जिल्हा बँक नोकरभरती : परीक्षा केंद्र बदलल्याने आर्थिक भुर्दंड, परीक्षार्थीचा आरोप…

तो अनेक दशकांचा मोठा संघर्ष आहे. तो संघर्ष संसदेत आणि सरकारदरबारी नव्या कायद्यांच्या आणि नियमांच्या निर्मितीपर्यंत गेला आहे. त्या प्रक्रियेचा परिणाम केवळ या एकाच गावावर झाला असे नाही तर आज देशातल्या कित्येक गावखेड्यांसाठी मेंढ्याचा संघर्ष पथदर्शी झाला आहे. मोहन हिराबाई हिरालाल मूळचे विदर्भातल्याच चंद्रपूरचे. पण सत्तरीच्या दशकात तरुण मोहनभाईंना त्यांच्या आयुष्याची दिशा मिळाली. तेव्हाची तरुणाईच एका भारवलेल्या संक्रमणातून जात होती. जयप्रकाश नारायणांनी ‘संपूर्ण क्रांती’ची हाक दिली होती. त्याला राजकीय परिमाणासोबत रचनात्मक ‘नवनिर्माणा’चीही एक दिशा होती. ती दिशा मोहनभाईंसारख्या अनेक तरुणांना आपलीशी वाटली. मोहनभाईंना ती गांधी, मग विनोबा या मार्गाने गडचिरोलीतल्या मेंढालेखा गावात घेऊन आली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pillar of the mawa nate mawa raj movement mohan hirabai hiralal passes away rgc 76 mrj