गोंदिया : बालाघाट जिल्ह्यातील किरणापूर पोलीस ठाणे हद्दीतील भक्कुटोला गावाच्या घनदाट जंगलात शनिवारी दुपारी प्रशिक्षणार्थी चार्टर विमान कोसळले. या अपघातात दोन वैमानिकांचा मृत्यू झाला. एका वैमानिकाचा मृतदेह सापडला असून दुसऱ्याचा शोध सुरू आहे. बालाघाटचे जिल्हा अतिरिक्त पोलीस अधीक्षक (नक्षल) आदित्य मिश्रा यांनी सांगितले की, किरणापूरच्या भक्कूटोला येथे एक प्रशिक्षणार्थी विमान कोसळल्याची माहिती पोलिसांना मिळाली असता पोलिसांचे पथक तत्काळ घटनास्थळी रवाना करण्यात आला आहे.
हेही वाचा >>> गडचिरोली : शाळेतून घरी परतताना नववीतील विद्यार्थिनीवर वीज कोसळली
घटनास्थळावरील चित्रफितीमध्ये ढिगाऱ्यात एका व्यक्तीचा मृतदेह दिसत आहे. मृतांची नावे, विमान कुठे जात होते आणि विमान अपघाताची कारणे अद्याप समजू शकलेली नाहीत. प्राथमिक तपासात, अपघातग्रस्त विमान गोंदिया जिल्ह्यातील वैमानिक प्रशिक्षण केंद्राचे आहे. पोलीस अधिकारी व पथक तपास करत आहेत. सदर इगरू कंपनीचे विमान काल सायंकाळपासून बेपत्ता होते. त्याबद्दल शेजारील जिल्ह्यात कळविण्यात आले होते. यातील पायलट व एक शिकाऊ पायलट कोण होते, याबद्दल ची माहिती सध्या मला नाही. पण विमान आमच्या प्रशिक्षण केंद्रातीलच आहे, असे गोंदियातील बिर्सी विमान पत्तन प्राधिकरणचे शफीक शाह यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.