नागपूर: इंडिगोच्या नागपूर- पुणे विमानाचे सारथ्य करण्यासाठी विमानतळावर निघालेल्या वैमानिकाचा हृदय विकाराच्या धक्क्यामुळे मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी दुपारी नागपूर विमानतळावर घडली. कॅप्टन मनोज सुब्रम्हण्यम रा. कांचीपुरम (तामिळनाडू) असे मृत्यू झालेल्या वैमानिकाचे नाव आहे.
इंडिगो विमान कंपनीने यासंदर्भात प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनानुसार इंडिगोचे विमान नागपूरहून पुण्यासाठी दुपारी एक वाजता उड्डाण घेणार होते. त्यासाठी कॅप्टन मनोज सुब्रमण्यम निघाले असता बोर्डिंग गेटजवळ अचानक कोसळले. विमानतळावरील कर्मचाऱ्यांनी त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात नेले. तेथून त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आले तेथे त्यांचा दु. २.२० मिनिटांनी त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूचे प्राथमिक कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगितले जाते. मात्र शवविच्छेदनानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
हेही वाचा… सोने खरेदीची सुवर्णसंधी… दरात घसरण, नागपुरात आजचे दर पहा
\कॅप्टन मनोज यांनी त्रिवेंद्रम-पुणे-नागपूर विमानाचे उड्डाण केले होते. त्यानंतर २७तासाची विश्रांती घेतल्यावर ते गुरुवारी दुपारी नागपूर-पुणे विमानाचे उड्डाण करणार होते. मात्र त्यापूर्वीच ही दुर्दैवी घटना घडली. या संदर्भात सोनेगाव पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.