अकोला : जिल्ह्यातील काही भागांत कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. शेतकऱ्यांनी वेळीच उपाययोना केल्यास त्यावर नियंत्रण मिळवणे शक्य असल्याचे कृषी विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कृषी विभागाच्या पथकाने बाळापूर तालुक्यात व्याळा, खिरपुरी येथे प्रक्षेत्र भेट दिली. त्यात कपाशी पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव आढळला. अकोला, अकोट, तेल्हारा तालुक्यांतील काही भागांतही बोंडअळीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात पेरणी झालेल्या व सध्या फुले, पात्या व लहान बोंड धारण केलेल्या कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. चिमलेल्या किंवा डोमकळीसदृश्य अवस्थेत असलेल्या प्रत्येक फुलात गुलाबी बोंडअळी आढळून आली. असे फुल अलगदपणे निघून येते. कोमेजलेल्या फुलांमध्ये गुलाबी बोंडअळीची दुसऱ्या व तिसऱ्या अवस्थेतील अळी फुलांमधून कोवळ्या बोंडामध्ये शिरताना आढळून आली आहे. कपाशीच्या शेतात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव सध्या स्थितीत १० ते २० टक्के आढळून आला आहे. त्यामुळे जूनच्या पहिल्या आठवड्यात पेरणी केलेल्या शेतकऱ्यांनी पिकाचे निरीक्षण करावे. असा प्रादुर्भाव इतरही भागात फुले अवस्थेत असणाऱ्या कपाशी पिकावर असण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचे सर्वेक्षण करून वेळीच नियंत्रणाच्या उपाययोजना कराव्या, असे आवाहन कृषी विभागाने केले.

हेही वाचा – “नेत्यांच्या चिठ्ठीवर कर्ज द्याल तर..”, गडकरी असे का म्हणाले?

कपाशीचे पीक ५० ते ६० दिवसांचे झालेल्या भागात फूल लागण्यास सुरुवात झाली आहे. या परिस्थितीत गुलाबी बोंडअळीची मादी उमलत असलेल्या फुलांच्या खालच्या बाजूला एकेरी अंडी घालते. त्यातून सूक्ष्म अळ्या बाहेर येऊन फुलांमध्ये प्रवेश करतात व उमलणाऱ्या पाकळ्या आतून तोंडातील धाग्यांच्या सहाय्याने बंद करून अळी फुलांमध्ये उपजीविका करते. प्रादुर्भावग्रस्त फुले न उमललेल्या गुलाबाच्या कळीसारखी दिसतात व ती आपण सहज ओळखू शकतो. या फुलांना ‘डोमकळी’ म्हणतात. त्यात हमखास गुलाबी बोंडअळी आपली उपजीविका करताना दिसते. फुलांच्या आतील भाग अळीने खाल्यामुळे बहुदा फुलांचे रुपांतर बोंडामध्ये होत नाही व ते गळून पडतात. फुलाचे रुपांतर बोंडामध्ये झाल्यास अळी बोंडामध्ये शिरून बोंड पोखरते. त्यामुळे नुकसान होते. शेतकरी उपाययोजना कराव्यात, असा सल्ला कृषी विभागाने दिला.

हेही वाचा – यवतमाळ : “मरणाने केली सुटका, जगण्याने…”, गँगरीन झालेल्या निराधार वृद्धेची कहाणी

कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. शेतकऱ्यांनी वेळीच उपाययोजना केल्यास नुकसान टाळता येईल. – शंकर किरवे, जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी, अकोला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pink worm attack on cotton in akola district ppd 88 ssb
Show comments