लोकसत्ता टीम

वाशीम : वाशीम शहरातील पाटणी चौक येथे खाद्य तेल टँकरचे कॉकमधील पाइप फुटल्याने त्यामधील तेल रस्त्यावर पाण्यासारखे वाहत होते. वाहत असलेले तेल पाहून नागरिकांनी मात्र तेल जमा करून घरी नेण्यासाठी एकच गर्दी केली. या घटनेत मात्र दुकान मालकाचे हजारों रूपयांचे खाद्य तेलाचे नुकसान झाले आहे.

शहरातील दागडिया यांच्या दुकानासमोर खाद्यतेल तेलाचे टँकर मशीनद्वारे खाली केले जात होते. मात्र, खाद्यतेल टँकर खाली करत असतांना अचानक टँकर मधील कॉकचे पाईप फुटले. ही बाब लक्षात येताच मशीन बंद करेपर्यंत पाईप मधून जवळपास सहाशे लिटर खाद्यतेल रस्त्यावर सांडले. खाद्य तेल रस्त्यावर सांडल्यामुळे पाण्यासारखे वाहत होते.

आणखी वाचा-ताडोबातील ‘छोटा मटका’ च्या वारसदाराची करामत पर्यटकांच्या नजरेत

वाहत असलेले तेल पाहताच उपस्थित असलेल्या पुरुष, महिला आणि लहान मुलांनी तेल जमा करून घरी नेण्यासाठी एकच गर्दी केल्याचे दिसून आले. त्यामुळे काही वेळ वाहतूकही विस्कळीत झाली होती. ही बाब वाहतूक पोलिसांच्या लक्षात येताच त्या ठिकाणी पोहोचून वाहतूक सूरळीत करण्यात आली. या लिकेज झालेल्या पाईपमुळे दागडिया यांच्या खाद्य तेलाचे अंदाजे ६० हजार रूपयाचे नुकसान झाले असल्याची प्राथमिक माहिती आहे.

Story img Loader