यवतमाळ : जीवन प्राधिकरणच्या अमृत पाणीपुरवठा योजनेने शहराची चाळणी केली असून, नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. शुक्रवारी दुपारी सव्वातीन वाजताच्या सुमारास येथील दत्त चौकात जीवन प्राधिकरणची मुख्य पाईपलाईन फुटल्याने ३० ते ४० फूट उंच कारंजे उडाले. पाण्याच्या या फवाऱ्याने परिसरातील अनेक दुकानदारांचे मोठे नुकसान झाले.
ही पाईपलाईन शहराला पाणीपुरवठा करणारी अमृत पाणीपुरवठा योजनेची नवीन पाईपलाईन आहे की जुनी, याबाबत अद्याप माहिती मिळाली नाही. मात्र १५ दिवसांपूर्वीच जीवन प्राधिकरणने या पाईपलाईनची डागडूजी केली होती. त्याच ठिकाणी पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले. सुदैवाने या घटनेत कोणाला दुखापत झाली नाही. मात्र पाण्याचे फवारे परिसरात उडाल्याने व्यावसायिकांचे नुकसान झाले.
हेही वाचा – करोना काळात वेळ काढून स्वयंपाक केला – नितीन गडकरी
तीन महिन्यांपूर्वी शहरात माइंदे चौकात भूगर्भात पाईपलाईन फुटून स्फोट झाल्याने मोठा खड्डा पडला होता व एक तरुणी जखमी झाली होती. चर्चरोड परिसरात आणि पीकेव्ही मार्गावर पाईपलाईनसाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून दोघांचा मृत्यू झाला होता. दोन दिवसांपूर्वीही वाघापूर-पिंपळगाव मार्गावर मजीप्राने खोदून ठेवलेल्या खड्ड्याचा अंदाज न आल्याने वाहनाचा अपघात झाला होता.