भंडारा : तुमसर तालुक्यातील खापा चौकात उभ्या असलेल्या टवेरा गाडीत पोलिसांना एक देशी कट्टा आणि दोन बुलेट सापडल्या. तुमसर पोलिसांच्या या कारवाईनंतर एकच खळबळ उडाली असून याचा संबंध आयपीएल जुगाराशी असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. या कारवाईमध्ये पोलिसांनी एकाला अटक केली असून अन्य एक आरोपी फरार आहे.
देशभरात सध्या आयपीएलचा फिवर सुरु आहे. आयपीएल सामन्यावर सट्टा लावणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर आहे. दरम्यान, देशी कट्टा आणि दोन राऊंडसह दोन तरुण खापा चौकात आलेले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे तुमसर पोलिसांनी कारवाई केली. त्याआधारे पोलिसांनी गाडीची तपासणी केली असता कट्टा आणि दोन बुलेट गोळ्या सापडल्या.
एका टवेरा गाडीत दोन युवक रामटेकहून येत होते. तुमसर तालुक्यातील खापा चौकात गाडी थांबवून ते दोघे एका हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. पोलीस करवाई नंतर या गाडीतील दोघांपैकी एक आरोपी फरार झाला असून दुसऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. सुमित संजय सोनवाने रा. रामटेक असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या कारवाईनंतर हा प्रकरणाचा संबंध आयपीएल जुगाराशी असून परिसरात कुठेतरी सट्टाबाजार सुरू आहे याबद्दल चर्चा रंगू लागल्या आहेत. मात्र याचा आयपीएल जुगाराशी खरोखरच काही संबंध आहे का ? जर स्वरक्षणासाठी आरोपींनी देशी कट्टा ठेवला असेल तर त्याची गरज का पडली ? या दोघांनी देशी कट्टा कुठून घेतला ? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत.
तुमसरचे ठाणेदार गायकवाड यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, फरार असलेला आरोपीच मुख्य सूत्रधार असल्याची दाट शक्यता आहे त्यामुळे तो सापडल्यावरच यामागे काय हेतू होता हे कळेल. सध्या त्याचा शोध आणि तपास सुरू आहे.