नागपूर : नवरात्र उत्सवात मोठ्या प्रमाणावर भाविक उपवास करतात. परंतु शारीरिक क्षमता, सहआजारासह आरोग्याच्या इतर प्रश्नांचा विचार करूनच उपवासाचे नियोजन करायला हवे. मधूमेहासह इतर आजाराच्या रुग्णांनी नऊ दिवस निर्जल उपवास टाळावा. आहाराकडेही लक्ष द्यावे, असा सल्ला शहरातील मधुमेह व आहार तज्ज्ञांनी दिला आहे. काहींचा ९ दिवसांचा उपवास असतो. काही जण संध्याकाळी उपवास सोडतात. एक वेळ उपवासाचे पदार्थाचे सेवन करतात तर काही जण केवळ पाणी पितात. परंतु प्रत्येकाने उपवास करताना स्वत:च्या शारीरिक क्षमतेचा विचार करणे आवश्यक आहे.

याबाबत आहार तज्ज्ञ कविता गुप्ता म्हणाल्या, मधुमेह रुग्णांनी कठोर व लांबकाळचा उपवास ठेवणे धोक्याचे आहे. मधुमेही व सहआजार असलेल्यांना उपवासादरम्यान अधिक काळजी घेण्याची गरज आहे. उपवासामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होऊन त्यांना ‘लो शुगर’ चा झटका येऊ शकतो. त्यामुळे या रुग्णांनी उपवास केला तरी थोड्या-थोड्या वेळाने फळ- दूध- प्रोटिनयुक्त पदार्थ गरजेनुसार खावे. या रुग्णांनी एकाच वेळी जास्त खाने योग्य नाही. त्यामुळे शरीरात मधुमेहाचे प्रमाण वाढू शकते.

हेही वाचा : विदर्भवाद्यांकडून आज नागपूर कराराचे ‘होळी’ आंदोलन

उपवासात मोठ्या प्रमाणावर नागरिक साबूदाणा खिचडी, वडे खातात. यात ‘स्टार्च’चे प्रमाण अधिक असते. त्यामुळे मधुमेहाचे प्रमाण किंवा लठ्ठपणा वाढण्याचा धोका असतो. काही नागरिक वजन कमी करण्यासाठी उपवास करतात. परंतु साबूूदाण्याचे पदार्थ सेवनाने त्यांचे वजन वाढू शकते, असेही कविता गुप्ता यांनी सांगितले.

हेही वाचा : राज्यात अतिसुक्ष्म धुलिकणांच्या प्रमाणात वाढ; प्रदूषणकारी उद्योगांचा परिणाम

सहआजार असलेल्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने उपवास करावा. मधुमेह, ह्रदयरोग, मूत्रपिंड, स्ट्रोकसह इतरही गंभीर आजार असणाऱ्या रुग्णांनी उपवास टाळावा. – डॉ. सुनील गुप्ता, मधुमेह तज्ज्ञ.