वर्धा : विदेशात फिरायला मिळाले तर मज्जाच मजा, अशी सार्वत्रिक भावना म्हणता येईल. आणि सरकारी खर्चाने जर अशी वारी घडणार असेल तर सोने पे सुहागा ठरणार. असा योग राज्यातील शिक्षक, मुख्याध्यापक व अधिकारी यांच्या वाट्याला आला आहे. मात्र असे भाग्यवंत केवळ ५०. ही मंडळी २२ ते २७ मार्च दरम्यान सिंगापूरला जात असून या खर्चास बुधवारी प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.
हा दौरा कशासाठी ? तर शिक्षण विभागाचा स्टार हा उपक्रम आहे. देशात व देशाबाहेरील अभ्यास दौरा त्यात असतो. आंतरराष्ट्रीय स्तरावर शिक्षण क्षेत्रात राबवण्यात येणारे वैविध्यपूर्ण उपक्रम, नावीन्यपूर्ण योजना याची माहिती करून घ्यायची. हे उपक्रम आपल्या राज्यात राबविण्याची शक्यता पडताळण्यासाठी हा दौरा आयोजित केल्या जातो. सिंगापूर दौरा त्यासाठीच ठरला असून त्यासाठी शिक्षक, मुख्याध्यापक व काही अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. प्रती व्यक्ती दोन लाख रुपये, अशी तरतूद झाली आहे.
या सिंगापूर अभ्यास दौऱ्यास देशाच्या परराष्ट्र मंत्रालयाची मान्यता लाभली आहे. अभ्यास दौरा व शाळांना भेटी याचा संपूर्ण खर्च महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या स्टार उपक्रमातून करण्यात आला आहे. दौऱ्यासाठी निवडलेल्या सर्व सदस्यांचा प्रवास कालावधी हा कर्तव्य कालावधी म्हणून गणल्या जाणार. तसेच वैद्यकीय विमा लागू होईल. या दौऱ्यातून प्राप्त केलेले ज्ञान तसेच आत्मसात केलेली कौशल्ये याचा लाभ प्रशिक्षण माध्यमातून अन्य संबंधितांना द्यावा लागणार.
अशा विदेशी अभ्यास दौऱ्यांचे वेळोवेळी आयोजन केल्या जात असते. स्टार उपक्रमात देशांतर्गत व देशाबाहेर अश्या दोन्ही प्रकारच्या दौऱ्यांचे आयोजन करण्याची तरतूद आहे. त्यासाठी शिक्षण विभागाने एकूण १५० व्यक्तीसाठी ३ कोटी रुपयाची तरतूद करून ठेवण्यात आली आहे. या नियोजित सिंगापूर दौऱ्यात राज्यातील विविध भागातील शिक्षक व मुख्याध्यापक आहेत. तसेच राज्य शिक्षण परिषद व प्रशिक्षण परिषद या दोन विभागाचे प्रत्येकी एक संचालक या दौऱ्यात सहभागी होणार आहे. प्राप्त माहितीनुसार या दौऱ्यात सिंगापूर येथे आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेल्या काही शाळा आहेत. नावीन्यपूर्ण उपक्रमांनी त्या चर्चेत असतात. या शाळांना हा दौऱ्यावरील गट भेट देणार. शाळेतील उपक्रम समजून घेत ते महाराष्ट्रात कसे अंमलात आणता येतील याचा विचार होईल.