बुलढाणा: समृद्धी महामार्गावरील भीषण अपघातानंतर सुरक्षिततेच्या संदर्भात राज्य रस्ते विकास महामंडळासह संबधित यंत्रणा खडबडून जागा झाल्या आहे. व्यापक जन आक्रोश लक्षात घेता, विविध उपाययोजना कार्यान्वित करण्याला वेग आला आहे.
यामुळे भूसंपादन व अन्य कारणामुळे कागदोपत्री रखडलेल्या जिल्ह्यातील नियोजित नव नगरे (स्मार्ट सिटी) निर्मितीच्या हालचाली सुरू झाल्याचे वृत्त आहे. मेहकरचे उप विभागीय अधिकारी दिनेश गीते यांची समृद्धी च्या उपजिल्हाधिकारी व प्रशासक ( नवनगरे) पदी झालेली नियुक्ती याचा एक भाग मानला जात आहे. जिल्ह्यातील ८७ किमीच्या समृद्धीसाठी लागणाऱ्या जमिनीचे भूसंपादन मध्ये त्यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे.
हेही वाचा… ‘एचटीबीटी’वरून शेतकरी, सरकारी यंत्रणा पुन्हा आमने-सामने! शेतकरी संघटेनचा सविनय कायदेभंग
यापूर्वी प्रशासक असतांना त्यांनी केवळ अधिकारी म्हणून नव्हे जिल्ह्याचे भूमिपुत्र म्हणून शेतकऱ्यांचे समुपदेशन, कुटुंबातील संघर्ष, आंदोलने याचे निरसन करणे आदी कामे केली. त्यामुळे दहा जिल्ह्यात बुलढाणा आघाडीवर राहिला. तसेच बांधकाम वेगाने होण्यास मदत मिळाली. स्मार्टसिटी साठी ८ गावांतील तब्बल ३३२८ हेक्टर जमिन लागणार आहे. भूसंपादनाचे हे आव्हानात्मक काम लक्षात घेता महामंडळाने गीते यांना प्रशासक पदाचा (प्र)भार दिल्याचे मानले जात आहे. विभागीय आयुक्त निधी पांडे यांनी ही नियुक्ती केली आहे.
हेही वाचा… घुबडाला इतर पक्षी हाकलून का लावतात? जाणून घ्या…
जिल्ह्यात दोन नवनगरे प्रस्तावित असून त्याचे कृषी समृद्धी केंद्र असे नामकरण करण्यात आले आहे. साब्रा-काब्रा ( मेहकर) व सावरगाव माळ( सिंदखेड राजा) येथे उभारण्यात येणारी केंद्रे परिसरासह तालुक्यांचा कायापालट करणारी ठरणार आहे. साब्रा-काब्रा अंतर्गत उमरा, फैजलपूर, गोंढाळा, साब्रा, काब्रा या गावांचा समावेश आहे. या गावांतील १३८२ हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार आहे. सावरगाव माळ अंतर्गत गोळेगाव, निमखेड व सावरगाव माळ मधील १९४५ हेक्टर जमीन संपादित करावी लागणार आहे.