अनिल कांबळे
नागपूर : गेल्या आठवड्यात राष्ट्रपती द्रौपती मुर्मू यांच्या मेडिकल रुग्णालयातील कार्यक्रमासाठी शहर वाहतूक शाखा आणि अजनी वाहतूक विभागाने अचूक नियोजन केले होते. त्यामुळेच परीसरात वाहतूक कोंडी झाली नव्हती. त्याच धर्तीवर हिवाळी अधिवेशनादरम्यान विधानभवनाच्याही बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. त्यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास होणार नसल्याचा दावा वाहतूक शाखेने केला आहे.
राष्ट्रपतींच्या दौऱ्यानिमित्त शहरात वाहतूक कोंडी होणार असा अनेकांचा अंदाज होता. मात्र, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, वाहतूक शाखेच्या उपायुक्त चेतना तिडके यांच्या मार्गदर्शनात अजनी वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक रितेश अहेर यांनी अचूक नियोजन केले. दौऱ्यात सर्वात मोठी समस्या वाहनतळाची असते. अनेक राजकीय महत्वाच्या व्यक्तीसह शासकीय अधिकाऱ्यांच्या सर्वाधिक वाहने असतात. त्यामुळे वाहतूक पोलीस उपायुक्त आणि अजनी वाहतूक विभागाने दौऱ्याच्या चार दिवसांपूर्वीच वाहतुकीचे नियोजन केले होते. दौऱ्याच्या पूर्व संध्येला पोलीस उपायुक्त आणि अजनीच्या पोलीस निरीक्षकांनी वाहतूक व्यवस्थेचा आढावा घेतला. वाहतूक विभागाच्या इतिहासात प्रथमच २१ वाहनस्थळ आणि त्यासाठी विशिष्ट रंगाच्या पासेसचा समावेश करण्यात आला होता. प्रत्येक वाहनाला वेगळ्या रंगाचे स्टिकरचा वापर करण्यात आला होता. तसेच प्रत्येक वाहनचालकाला वाहन कुठे व कोणत्या वाहनतळावर उभे करायचे,याबाबत सूचना देण्यात आल्या. या अचूक नियोजनामुळे या परीसरात कुठेही वाहतूक कोंडी झाली नव्हती तर नागरिकांनाही त्रास झाला नव्हता. आता तोच फार्मूला विधानभवन बंदोबस्तासाठी वापरण्यात आला आहे. वेगवेगळ्या रंगाच्या पासेस आणि वाहनतळाबाबत संपूर्ण माहिती वाहनाच्या चालकांना देण्यात आली. तसेच सामान्य नागरिकांना वेगळे वाहनतळ उपलब्ध करून देण्यात आले. विधानभवनावर धडकणाऱ्या मोर्चामुळे यापूर्वी वाहतूक कोंडी होत होती. त्याचा त्रास सामान्य नागरिकांना होत होता. परंतु, मोर्चाचे मार्ग आणि त्यांच्या वेळेचे नियोजन वाहतूक शाखेने केले आहे. त्यामुळे आता यावर्षी मोर्चामुळे वाहतुकीची कोंडी होणार नाही तसेच नागरिकांनाही कोणताही त्रास होणार नाही, याची पुरेपूर काळजी वाहतूक शाखेने घेतली आहे.
हेही वाचा >>>भानूसखिंडी व बछड्याला पाहून रानगवा थबकला, नजरानजर झाली अन्… ताडोबात पर्यटकांनी अनुभवला थरार…
इंस्टा, फेसबूकवरून जनजागृती
नागपूर पोलिसांनी पहिल्यांदाच नागपूरकरांना माहिती देण्यासाठी समाजमाध्यमांचा वापर केला. इंस्टाग्राम, फेसबुक, ट्वीटर आणि व्हॉट्सअॅपवरून वाहतूक पोलिसांनी वाहनतळ, बंद करण्यात आलेले रस्ते आणि मार्ग बदललेले रस्ते याबाबत माहिती देत सतर्क केले. त्यामुळेसुद्धा वाहतूक कोंडी टळण्यास मदत होणार आहे.
राष्ट्रपतींच्या दौऱ्यादरम्यान वाहतुकीचे केलेले नियोजन यशस्वी झाले. त्याच धर्तीवर अधिवेशनादरम्यान विधानभवन परीसर आणि अन्य ठिकाणी नियोजन केले आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीची शक्यता कमी आहे. – चेतना तिडके, पोलीस उपायुक्त (वाहतूक शाखा)
अजनी वाहतूक विभागाने राष्ट्रपती दौऱ्यांच्या वाहतूक बंदोबस्तासाठी वरिष्ठांच्या आदेशान्वे महत्वाची भूमिका निभावली होती. ते नियोजन यशस्वी होऊन वाहतूक विभागाचे कौतूक झाले होते. अधिवेशनादरम्यानसुद्धा वाहतूक नियोजनात योगदान दिले आहे. – रितेश अहेर (पोलीस निरीक्षक, अजनी वाहतूक शाखा)